पुणे: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 9 वर्षांनंतर मतदारांनी दिलेल्या कौलाचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. शहरातील अत्यंत चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक 20 (शंकर महाराज मठ, बिबेवाडी) मध्ये भारतीय जनता पक्षाने आपले वर्चस्व सिद्ध केले असले, तरी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने दिलेल्या धक्क्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
बिबेवाडीत भाजपचे वर्चस्व, पण...
प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे राजेंद्र शिळीमकर, तन्वी दिवेकर आणि मानसी देशपांडे या तीन उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला आहे. मात्र, याच प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेसचे गौरव घुले यांनी भाजपच्या विजयरथाला रोखले. अत्यंत चुरशीच्या लढतीत गौरव घुले यांनी भाजपचे उमेदवार महेंद्र शिंदे यांचा पराभव करत आपली जागा राखली आहे. घुले यांच्या या विजयामुळे भाजपला या प्रभागात ‘क्लीन स्वीप’ देता आला नाही.
हेही वाचा: Kalyan Dombivli Election Results 2026: कल्याण डोंबिवलीमधून प्रल्हाद म्हात्रे यांचा विजय; ठाकरे युतीचा 'फॅक्टर' चालला
पुण्यात काँग्रेसचा श्रीगणेशा
दुसरीकडे, प्रभाग क्रमांक 18 मधून काँग्रेससाठी आनंदाची बातमी आली आहे. काँग्रेसचे साहिल केदारी यांनी येथून विजय मिळवत पुणे महानगरपालिकेत काँग्रेसचे खाते उघडले आहे. गेल्या काही काळापासून बॅकफूटवर असलेल्या काँग्रेससाठी केदारी यांचा हा विजय संजीवनी देणारा मानला जात आहे.
नऊ वर्षांनंतरचा कौल: कोणाचे होणार पुणे?
पुणे महानगरपालिकेच्या 41 प्रभागांतील 165 जागांसाठी यंदा चौरंगी लढत पाहायला मिळाली. महायुतीमधील तीनही पक्ष स्वतंत्रपणे लढल्यामुळे मतांचे विभाजन होऊन निकाल कोणाच्या बाजूने लागणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती.
निवडणुकीची स्थिती:
एकूण जागा: 165 (41 प्रभाग)
महत्त्वाचा विजय: गौरव घुले (राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट) यांनी महेंद्र शिंदे यांचा केला पराभव.
काँग्रेसची एन्ट्री: साहिल केदारी यांच्या रूपाने काँग्रेसचे पाऊल पुणे मनपात पडले.
9 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर पुणेकरांनी दिलेला हा कौल नक्की कोणाला सत्तेच्या खुर्चीवर बसवतो, हे पुढील काही तासांत स्पष्ट होईल. मात्र, सुरुवातीच्या कलानुसार पुणे महापालिकेत सत्तास्थापनेसाठी अपक्ष आणि छोट्या पक्षांची भूमिका किंगमेकर ठरू शकते.
हेही वाचा: BMC Election Results 2026: प्राथमिक कलांमध्ये भाजपने ठोकले शतक!; उद्धव-राज युतीची विकेट? मुंबईवर भाजपचा झेंडा?