Sunday, March 08, 2026 10:41:59 PM

Pune PMPL Bus: महाशिवरात्रीनिमित्त PMPL सज्ज; निळकंठेश्वर, बनेश्वरसह इतर शिवमंदिरात जाण्यासाठी 'या' वेळेत सुटणार जादा बसेस

येत्या रविवारी भाविकांना निळकंठेश्वर, बनेश्वर आणि घोरावडेश्वर यांसारख्या प्रसिद्ध देवस्थानांपर्यंत विनासायास पोहोचता यावे, यासाठी प्रशासनाने अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून दिली आहे.

pune pmpl bus महाशिवरात्रीनिमित्त pmpl सज्ज  निळकंठेश्वर बनेश्वरसह इतर शिवमंदिरात जाण्यासाठी या वेळेत सुटणार जादा बसेस

Pune PMPL Bus: महाशिवरात्रीनिमित्त पुण्यातील प्रमुख शिवमंदिरांमध्ये होणारी भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेऊन पुणे महानगर परिवहन महामंडळाने (PMPL) विशेष नियोजन केले आहे. येत्या रविवारी भाविकांना निळकंठेश्वर, बनेश्वर आणि घोरावडेश्वर यांसारख्या प्रसिद्ध देवस्थानांपर्यंत विनासायास पोहोचता यावे, यासाठी प्रशासनाने अतिरिक्त बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा आणि प्रवासाचे योग्य नियोजन व्हावे यासाठी पहाटेपासूनच बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

भक्तांसाठी 'असे' आहे बसचे वेळापत्रक 

महाशिवरात्रीनिमित्त भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 'पीएमपीएल'ने पहाटेपासूनच विशेष बसेसचे नियोजन केले आहे. निळकंठेश्वर दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी स्वारगेट मुख्य स्थानकावरून पहाटे 3:30 वाजता पहिली बस सुटेल; या मार्गावर प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन स्वारगेट ते पानशेत दरम्यान एकूण 14 अतिरिक्त बसेस सोडण्यात येणार आहेत. बनेश्वर मंदिरासाठी कात्रज (सर्पोद्यान) येथून पहाटे 5:30 वाजता पहिली फेरी सुरू होईल आणि त्यानंतर दर 20 मिनिटांच्या अंतराने बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच, घोरावडेश्वर येथे जाणाऱ्या भक्तांसाठी निगडी (पवळे चौक) येथून पहाटे 5:20 वाजता पहिली बस सुटेल, जी भाविकांना थेट शंकरवाडी पायथ्यापर्यंत घेऊन जाईल. या व्यतिरिक्त, कात्रजवरून सासवड, केतकावळे (बालाजी मंदिर), राजगड आणि सारोळा या मार्गांवरून जाणाऱ्या बसेसचा लाभही भाविकांना घेता येईल. तसेच निगडीवरून मार्ग क्र. 228, 305 आणि 371 सह इतर 7 मार्गांवर बसेस उपलब्ध असतील.

PMPL ताफ्यात 45 नवीन ई-बसेस दाखल; पण प्रतीक्षा कायम
एककीडे सण-उत्सवासाठी जादा बसेसचे नियोजन होत असताना, पीएमपीच्या ताफ्यात अखेर 45 नवीन ई-बसेस (Electric Buses) दाखल झाल्या आहेत. विशेष म्हणजे, 5 वर्षांपूर्वीच्या करारानुसार या बसेस येणे अपेक्षित होते. नवीन बसेस दाखल झाल्या असल्या तरी अद्यापही कराराप्रमाणे 110 बसेस येणे बाकी आहे, ज्यामुळे बसची कमतरता अद्याप पूर्णपणे दूर झालेली नाही.

हेही वाचा - Glorious History of Shivaji Maharaj : शिवरायांच्या पराक्रमाला पॅरिसमध्ये मानाचा मुजरा! महाराष्ट्राच्या 12 किल्ल्यांना UNESCOचे जागतिक वारसा प्रमाणपत्र

प्रशासकीय दिरंगाईवर प्रश्नचिन्ह आणि प्रवाशांना आवाहन
बसेसची तीव्र कमतरता असतानाही ठेकेदाराकडून होणाऱ्या विलंबाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे का? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. ठेकेदारावर कडक कारवाई करण्याऐवजी प्रशासन इतके 'मेहरबान' का, अशी चर्चा प्रवासी वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, महाशिवरात्रीला खाजगी वाहनांची गर्दी टाळण्यासाठी आणि सुरक्षित प्रवासासाठी जास्तीत जास्त सार्वजनिक वाहतुकीचा (PMPL) वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
 


सम्बन्धित सामग्री