Saturday, May 17, 2025 09:45:31 PM

पत्नीला फसवून आणखी दोन लग्न करणारा पोलीस अधिकारी निलंबित

इम्रान मुल्ला यांनी एकाचवेळी तिन्ही लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या संपूर्ण घटनेमुळे दलाची प्रतिमा डागळली आहे.

पत्नीला फसवून आणखी दोन लग्न करणारा पोलीस अधिकारी निलंबित

कोल्हापूर: शिरोळ पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस उपनिरीक्षक इम्रान मुल्ला (रा. रेटरे बुद्रुक, जिल्हा सातारा) यांच्या विरोधात त्यांच्याच बायकोने दिलेल्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. इम्रान मुल्ला यांनी एकाचवेळी तिन्ही लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या संपूर्ण घटनेमुळे दलाची प्रतिमा डागळली आहे.

इम्रानने पहिलं लग्न लपवून आफरीनशी लग्न केलं:

इम्रान मुल्ला यांचा विवाह 2019 मध्ये आफरीन मुल्ला यांच्याशी झाला होता. त्यावेळी ते गोंदिया येथे पोलीस सेवेत कार्यरत होते. मात्र लग्न झाल्यानंतर काही काळातच त्यांच्या वैवाहिक आयुष्यात वाद-विवाद सुरू झाला. अशातच इम्रानने त्याच्या बायकोला, म्हणजेच आफरीन यांना शारीरिक आणि मानसिक त्रास देऊ लागला. त्यामुळे नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून आफरीन यांनी गोंदियातील केशारी पोलीस ठाण्यात जाऊन पती इम्रानवर शारीरिक आणि मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करून गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणानंतर इम्रान मुल्ला याला तात्पुरते निलंबित करण्यात आले होते.

घटस्फोट न घेताच दुसरे आणि नंतर तिसरे लग्न:

पुढील चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली की, 2015 साली इम्रान मुल्ला याचे पहिले लग्न झाले होते. इतकंच नाही तर त्याचा कायदेशीररीत्या घटस्फोटदेखील झाला नव्हता. ही माहिती लपवून इम्रानने आफरीनसोबत दुसरे लग्न केले होते. मात्र, इतक्यावरच न थांबता इम्रानने 23 जून 2024 रोजी तिसरे लग्न केल्याची माहिती आफरीन यांना मिळाली. यावर आक्षेप घेत त्यांनी कराड पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल केली. मात्र, कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे त्यांनी माहितीच्या अधिकारात चौकशीची मागणी केली.

पोलिसांच्या तपासात इम्रानने तिसऱ्या लग्नाची कबुली:

यादरम्यान, इम्रान मुल्ला याला चौकशीसाठी बोलावल्यावर त्याने, 'सुहाना कुमार फक्त माझी चांगली मैत्रीण आहे. माझं तिच्यासोबत अजिबात लग्न झालं नाही', असा बचाव केला. मात्र, पोलिसांच्या तपासात सुहाना कुमार हिनेच, 'माझं लग्न इम्रान मुल्ला याच्यासोबतच झालं आहे', अशी कबुली दिली. तसेच, मुस्लिम कायद्यानुसार तिहेरी तलाकाची नोटीस देऊन आपण तिसरे लग्न केल्याचा धक्कादायक खुलासादेखील यावेळी इम्रानने केला.

या प्रकरणामुळे इम्रान मुल्ला यांनी आतापर्यंत तीन वेळा विवाह केल्याचे स्पष्ट झाले असून, आफरीनसोबतचा तलाकसुद्धा न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे इम्रान यांचे तिसरे लग्न कायदेशीरदृष्ट्या अमान्य ठरते. पत्नी आफरीन यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर अखेर कोल्हापूर पोलीस विभागाने इम्रान मुल्ला याला सेवेतून निलंबित करण्याचा निर्णय घेतला.

या घटनेमुळे पोलिसांची प्रतिमा मलीन:

'या प्रकरणामुळे, संपूर्ण पोलीस खात्याची प्रतिष्ठा धोक्यात आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याच्या अशा वर्तनामुळे संपूर्ण विभागाची प्रतिमा मलीन झाली', अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे केली. या संपूर्ण घडामोडींमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली असून, पुढील तपास न्यायप्रविष्ठ प्रक्रियेत आहे.


सम्बन्धित सामग्री