Tuesday, February 17, 2026 08:35:32 PM

Ajit Pawar Last Speech: 'राजकारण लय वंगाळ आहे, धंदा-पाणी करा अन्...'; अजित पवारांचा 'तो' सल्ला अखेरचा ठरला

एका जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी नेहमीच्या शैलीत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या होत्या. ते म्हणाले होते की, &quotकाहींना जमिनीचे पैसे आले की राजकारणाची हौस येते. बायकोला उभं करा, स्वतः निवडणूक लढवा

ajit pawar last speech राजकारण लय वंगाळ आहे धंदा-पाणी करा अन् अजित पवारांचा तो सल्ला अखेरचा ठरला

Ajit Pawar Last Speech: "राजकारण लय वंगाळ आहे, त्यापेक्षा धंदा-पाणी करा आणि मस्त जगा..." चाकणच्या सभेत अजित पवारांनी दिलेला हा रोखठोक सल्ला आज त्यांचा शेवटचा संदेश ठरेल, असे कोणालाही वाटले नव्हते. बुधवारी सकाळी बारामती विमान अपघातात अजित पवारांचे निधन झाले आणि एका वादळी पर्वाचा अंत झाला. त्यांच्या जाण्याने कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेला आक्रोश आणि रुग्णालयाबाहेरील दृश्ये काळजाचा ठोका चुकवणारी आहेत.

काय होता दादांचा तो 'लाईफ मंत्र'?
एका जाहीर सभेत बोलताना अजित पवारांनी नेहमीच्या शैलीत कार्यकर्त्यांना कानपिचक्या दिल्या होत्या. ते म्हणाले होते की, "काहींना जमिनीचे पैसे आले की राजकारणाची हौस येते. बायकोला उभं करा, स्वतः निवडणूक लढवा, असं करू नका. राजकारण खूप वाईट आहे. त्यापेक्षा मिळालेल्या पैशातून मुलाबाळांना चांगलं शिकवा, निर्व्यसनी राहा आणि आनंदाने जगा. पैसे संपले की हाताला चुना लावून बसण्याशिवाय पर्याय उरणार नाही." कार्यकर्त्यांना दिलेला हा व्यावहारिक सल्ला आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

हेही वाचा - Indian Politicians Died in Air Crash: संजय गांधी ते अजित पवार... भारतीय राजकारणात विमान प्रवासात 'या' बड्या नेत्यांचा मृत्यू

रुग्णालयाबाहेर आसवांचा महापूर
अजितदादांचे पार्थिव ज्या रुग्णालयात ठेवण्यात आले आहे, तिथे त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. आपला नेता अशा प्रकारे सोडून जाईल, यावर कार्यकर्त्यांचा विश्वासच बसत नाहीये. रुग्णालयात पोहोचलेले पुतणे युगेंद्र पवार, आमदार रोहित पवार आणि सुपुत्र जय पवार यांना अश्रू अनावर झाले होते. नेत्याला शेवटचे पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी केलेला हंबरडा पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

पवार कुटुंब बारामतीत एकवटले
घटनेचे वृत्त समजताच संपूर्ण पवार कुटुंब बारामतीकडे रवाना झाले आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार तातडीने दिल्लीहून बारामतीत पोहोचल्या आहेत. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रतिभा काकी यांनीही रुग्णालयात धाव घेतली आहे. कुटुंबातील सदस्यांचा आक्रोश पाहून बारामतीवर शोककळा पसरली आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील हा 'सडेतोड' माणूस आज कायमचा शांत झाला असून, त्यांनी दिलेला 'मस्त जगण्याचा' सल्ला आता केवळ आठवण म्हणून उरला आहे.
 


सम्बन्धित सामग्री