Wednesday, November 19, 2025 01:51:13 PM

Deepak Kesarkar: पवई ओलीस नाट्य प्रकरणात दिपक केसरकरांचं स्पष्टीकरण; म्हणाले “त्या वेळी मी मंत्रीपदावर नव्हतो, म्हणून...”

गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, केसरकर यांचा जबाब लवकरच नोंदवला जाणार असल्याचे संकेत आहेत. कारण घटनेदरम्यान त्यांचं नाव वारंवार पुढे आलं होतं.

deepak kesarkar पवई ओलीस नाट्य प्रकरणात दिपक केसरकरांचं स्पष्टीकरण म्हणाले “त्या वेळी मी मंत्रीपदावर नव्हतो म्हणून”

मुंबई : 30 ऑक्टोबर रोजी पवईतील आर. ए. स्टुडिओमध्ये ही थरारक घटना घडली होती. रोहित आर्याने आर्थिक व्यवहारांतील थकबाकी आणि शिक्षण विभागाकडून रक्कम न मिळाल्याच्या नाराजीमुळे हे पाऊल उचलल्याचा दावा केला होता. त्याने स्टुडिओत अल्पवयीन मुलांना आणि काही ज्येष्ठ नागरिकांना ओलीस ठेवलं होतं. तणावपूर्ण परिस्थितीत पोलिसांनी शौर्य दाखवत सर्व ओलीसांना सुरक्षित बाहेर काढलं. मात्र, या कारवाईदरम्यान गोळीबार झाला आणि रोहित आर्याचा मृत्यू झाला. पवईतील आर. ए. स्टुडिओमध्ये घडलेल्या ओलीस नाट्यानंतर या प्रकरणाने आता नवा वळण घेतला आहे. पोलिसांशी वाटाघाटीच्या वेळी आरोपी रोहित आर्या याने माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बोलण्याची मागणी केली होती. मात्र, त्या वेळी केसरकर यांनी त्याच्याशी संवाद साधण्यास नकार दिला होता. या निर्णयामागचं कारण आता स्वतः केसरकर यांनी स्पष्ट केलं आहे.

माध्यमांशी बोलताना केसरकर यांनी स्वतःच या निर्णयामागचं कारण स्पष्ट केलं. ते म्हणाले, “मी सध्या मंत्री नाही, त्यामुळे रोहित आर्याला कोणतंही ठोस आश्वासन देणं माझ्या अधिकारात नव्हतं. त्या वेळी ओलीस ठेवलेली मुलं सुरक्षित नव्हती आणि अशा परिस्थितीत जबाबदार पदावर असलेल्या अधिकाऱ्यांनीच संवाद साधणं योग्य होतं. म्हणूनच मी पोलिसांना सुचवलं की, संबंधित शिक्षण विभागातील अधिकारी किंवा विद्यमान मंत्री यांनीच त्याच्याशी बोलावं.” त्यांनी पुढे सांगितलं, “या प्रकरणात पोलिसांनी मला विचारणा केली तर मी नक्कीच चौकशीत सहकार्य करीन. कायदा सर्वांसाठी समान आहे, आणि सत्य समोर आलंच पाहिजे.”

हेही वाचा: Rohit Arya Case: पवईतील आर. ए. स्टुडिओ प्रकरणात नवे उघड: रोहित आर्याशी संपर्कात असलेले मराठी कलाकार चौकशीच्या रडारवर

दरम्यान, गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून, केसरकर यांचा जबाब लवकरच नोंदवला जाणार असल्याचे संकेत आहेत. कारण घटनेदरम्यान त्यांचं नाव वारंवार पुढे आलं होतं. रोहित आर्याच्या मृत्यूबाबत पोस्टमॉर्टम अहवालातही मोठा खुलासा झाला आहे. जे. जे. रुग्णालयात करण्यात आलेल्या तपासणीत स्पष्ट झालं की, रोहित आर्याचा मृत्यू छातीत गोळी लागल्याने झाला. ती गोळी अत्यंत घातक स्वरूपाची होती आणि त्याच्या वाचण्याची कोणतीही शक्यता नव्हती, असं डॉक्टरांनी नमूद केलं आहे.

या घटनेनंतर आता गुन्हे शाखा सर्व धागेदोरे जोडून संपूर्ण सत्य बाहेर आणण्याच्या प्रयत्नात आहे. रोहित आर्या, शिक्षण विभाग आणि केसरकर यांच्या नावाभोवती घोंगावणारा संशय दूर करण्यासाठी चौकशी निर्णायक ठरणार आहे. पवईतील या रक्तरंजित घटनेने केवळ मुंबईच नव्हे, तर संपूर्ण राज्य हादरले आहे.

हेही वाचा: Cyclone Alert: महाराष्ट्रावर पुन्हा पावसाचं सावट? नव्या चक्रीवादळाने टेन्शन वाढलं; पुढील 48 तास अतिशय महत्त्वाचे


सम्बन्धित सामग्री