Thursday, February 12, 2026 03:27:40 PM

Prakash Ambedkar: ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा? वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी कोण कुणासोबत जाणार हे सांगणे कठीण झाल्याचे म्हटले आहे.

prakash ambedkar ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये मिठाचा खडा वंचितच्या प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

मुंबई: सध्या राज्याच्या राजकारणात महानगरपालिका निवडणुकांनंतर सगळीकडे सत्ता स्थापन करण्यासाठी हातमिळवणी सुरू असताना, कल्याण - डोंबिवली महानगरपालिकेत मनसे आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र येत असल्याच्या घडामोडींवर वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बदलत्या राजकीय समीकरणांवर भाष्य करताना, कोण कोणाला पाठिंबा देईल हे ओळखणे दिवसेंदिवस कठीण होत चालल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान केले आहे. “मी निवडणुकीपूर्वीही सांगितले होते आणि आताही सांगतो की, कोण कसा फिरेल आणि कोण कोणाला पाठिंबा देईल, हे जज करणे सध्या फारच कठीण झाले आहे,” असे स्पष्ट मत त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पाठिंब्यावर प्रतिक्रिया देताना आंबेडकर म्हणाले की, “सध्या जे इंडिकेशन मिळत आहेत, त्यावरून असेच दिसते की त्या आघाडीतही काही ठोस किंवा विश्वासार्ह चित्र नाही.” यामुळे राज्यातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची होत असल्याचे संकेत मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

याच पार्श्वभूमीवर बोलताना आंबेडकर यांनी मनसे आणि ठाकरे गटातील संभाव्य युतीवर भाष्य केले. “उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीमध्ये पुन्हा एकदा दरी निर्माण होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे,” असा दावा त्यांनी केला. दोन्ही पक्षांमधील संबंधांबाबत संभ्रमाचे वातावरण असल्याचेही त्यांनी सूचित केले.

हेही वाचा: Sajjan Kumar : मोठी बातमी! 1984 शीख दंगल प्रकरणी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची आरोपातून निर्दोष मुक्तता

ठाकरे बंधूंवर खोचक टोला लगावताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, “लग्न एकाशी आणि प्रेम दुसऱ्याशी, अशी अवस्था असेल तर ते लग्न टिकेल का?” या शब्दांत त्यांनी राजकीय युतीतील विसंगतीकडे लक्ष वेधले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते फारूक अहमद यांनी यापूर्वी दिलेल्या एका माहितीचा उल्लेख करत आंबेडकर म्हणाले की, “मिश्रा नावाची एक व्यक्ती ही उद्धव ठाकरे यांना ‘नंबर एक’ आणि ‘नंबर दोन’ यांच्या वतीने भेटल्याची माहिती आम्हाला मिळाली होती.” ही माहिती खरी असल्याचे आम्ही मानतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या सर्व घडामोडींवरून मनसे आता ठाकरे गटापासून वेगळी भूमिका घेण्याच्या दिशेने जात असल्याचे संकेत मिळत असल्याचा दावा प्रकाश आंबेडकर यांनी केला. आगामी काळात राज्यातील राजकीय युती आणि आघाड्यांचे चित्र अधिक स्पष्ट होईल, मात्र सध्या अनिश्चितता आणि बदलते संकेत हेच वास्तव असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा: Vikas Gogawale : महाडमधलं मारहाण प्रकरण, विकास गोगावले अखेर पोलिसांना शरण


सम्बन्धित सामग्री