कोल्हापूर : प्रशांत कोरटकरची जेलमधून सुटका झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्यामुळे कोरटकरला जेल झाली. दोन दिवसांपूर्वीच कोरटकरला जामीन मंजूर झाला होता. परंतु कागदपत्रांची पूर्तता न झाल्यामुळे कोरटकरचा न्यायालयातील मुक्काम आणखी वाढला आहे. प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजीत सांवत यांना धमकी दिल्यामुळे कोरटकरला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अखेर आज कोल्हापूर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कोरटकरला कारागृहातून बाहेर काढण्यात आले.
इतिहास अभ्यास इंद्रजीत सावंत यांना धमकी दिल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरची न्यायालयात रवानगी झाली होती. पण आज दुपारी कोरटकरला कारागृहातील अंडासेलमधून बाहेर काढले. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले अशी माहिती कारागृहाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. कोरटकरचा जामीन 9 एप्रिलला झाला होता. मात्र जामीनाचे पत्र कळंब कारागृहात पोहोचू शकले नाही. त्यामुळे कोरटकरची सुटका झाली नाही. कागदपत्रांची पूर्तता होताच, आज कोरटकरची सुटका झाली. सुनावणीवेळी न्यायालय परिसरात कोरटकरवर हल्ला झाला होता. त्यामुळे कडक बंदोबस्तात कोरटकरला कारागृहातून बाहेर काढण्यात आले.
हेही वाचा : उदयनराजेंच्या वक्तव्यानं नव्या वाद?
प्रशांत कोरटकरने 25 फेब्रुवारीच्या रात्री इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना फोन करून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केले होते. त्यानंतर कोरटकर फरार झाला. कोल्हापूर पोलिस त्याच्या मागावर होते. 25 मार्च रोजी तेलंगणातून कोरटकरला अटक करण्यात आली. त्यानंतर न्यायालयाच्या निर्णयामुळे त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढे 14 दिवसांसाठी त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. त्यानंतर वकिलांमार्फत त्याने जामीनसाठी अर्ज केला होता. पण सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांनी केलेल्या जोरदार युक्तिवादामुळे कोरटकरचा मुक्काम वाढला. आतापर्यंत बऱ्याचवेळा कोरटकरने जामीनसाठी अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने तो फेटाळला होता. अखेर बुधावारी न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला.