Pratibha Setu: सिव्हिल सेवा परीक्षेत (UPSC) प्रत्येक टप्पा यशस्वीपणे पार करूनही अंतिम यादीत स्थान न मिळालेल्या हुशार उमेदवारांसाठी एक सकारात्मक संधी निर्माण झाली आहे. UPSCने नुकताच सुरू केलेला ‘प्रतिभा सेतू’ (Pratibha Setu) हा उपक्रम, हाच एक 'टॅलेंट ब्रिज' म्हणजेच प्रतिभेचा सेतू ठरत आहे.
प्रतिभा सेतू या नावाचा अर्थच आहे Professional Resource And Talent Integration; Bridge for Hiring Aspirants. या उपक्रमाचं मुख्य उद्दिष्ट आहे, उत्कृष्ट पण अयशस्वी उमेदवारांना दुसरी संधी देणं आणि त्यांना योग्य नोकरीपर्यंत पोहोचवणं.
या अंतर्गत:
-सर्व टप्पे यशस्वी पार केलेले पण अंतिम यादीत नसलेले UPSC उमेदवार, त्यांची सॉफ्ट बायोडेटा (शैक्षणिक पात्रता, परीक्षेतील यश, संपर्क माहिती) त्यांच्या संमतीने विश्वासार्ह नियोक्त्यांपर्यंत पोहोचवला जातो.
-हे नियोक्ता म्हणजे सरकारी कंपन्या (PSUs), मंत्रालये, खाजगी कंपन्या जे चांगले कौशल्य असलेले उमेदवार शोधत असतात.
-यामध्ये पूर्ण स्वैच्छिक सहभाग, गोपनीयता आणि माहिती सुरक्षेला प्राधान्य देण्यात आलं आहे.
-पूर्वीचा ‘Public Disclosure Scheme’ हा उपक्रमच आता अधिक सुसंघटित, विश्वासार्ह आणि परिणामकारक रूपात ‘प्रतिभा सेतू’ म्हणून विकसित करण्यात आला आहे.
हा उपक्रम केवळ नोकरी मिळवून देण्यापुरता मर्यादित नाही, तर तो हजारो मेहनती, अभ्यासू उमेदवारांच्या स्वप्नांना नवा ध्यास देतो, त्यांचा संघर्ष व्यर्थ न जाता समाजात उपयोगी ठरतो, याची हमी देतो. यामुळे UPSC परीक्षा अपयशी ठरली तरी आयुष्य मात्र अपयशी ठरत नाही, हे ‘प्रतिभा सेतू’ अधोरेखित करत आहे.