मुंबई : यंदा मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. आधीच आलेल्या पावसाने माणसांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात सगळीकडे पावसाने जोर धरला आहे. एकीकडे गरमीपासून दिलासा मिळाला आहे तर दुसरीकडे पावसामुळे बऱ्याच जणांचे नुकसान झाले आहे.
बारामती तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाचा कहर सुरु आहे. पाच दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत असल्याने नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने सध्या डोर्लेवाडी गावामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच बारामती वालचंदनगर बावडा रोड पाण्याखाली गेला आहे. रस्त्यावर सध्या गुडघाभर पाणी आहे. याच धोकादायक पाण्यातून वाहन चालकाची ये - जा सुरू आहे. सध्या तरी पावसाचा जोर कायम आहे. यामुळे पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढतच आहे.
हेही वाचा : चिमुकलीवर वयोवृद्ध नराधमाचा लैंगिक अत्याचार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालंय. सतत पडणाऱ्या या पावसामुळे अनेक नद्यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. दरम्यान, कणकवली-आचरा-मालवण राज्य मार्गाचे काँक्रिटीकरणाचे काम सध्या सुरू असून या मार्गावरूनच वरवडे येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाच्या कामासाठी पर्यायी वाहतूक सुरू करण्यात आली होती. मात्र सततच्या पावसामुळे हा पर्यायी रस्ता पूर्णतः वाहून गेला. त्यामुळे पुढील अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून सातत्याने पाऊस आहे. आजही मान्सूनपूर्व पावसाने पहाटेपासून हजेरी लावली असून पावसाचे रिपरिप कायम असून पावसामुळे उन्हाळी भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत जवळपास 15 ते 20 कोटींच्या आसपास वीट भट्टी, भात शेती त्याचबरोबर इतर नुकसान झाले आहे. आताही हा पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला भात पिकाचा घास पाऊस हिरावून घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजा संकटात असल्याचे चिन्ह आहे.
पुणे जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ग्रामीण भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः मेंढीपालन करणाऱ्या कुटुंबांवर या पावसाचा मोठा फटका बसला असून, रात्रभर पडलेल्या पावसामुळे आणि झालेल्या गारठ्यामुळे मेंढ्या अक्षरशः कुडकुडून गेल्या आहेत. मुंबईसह उपनगरांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हवामान विभागाकडून पुढील 48 तासांसाठी 20 जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगरात रिमझिम पाऊस पडत असताना शेतकरी मशागतीच्या कामात व्यस्त झाले आहेत. रोहिणी नक्षत्र सुरू असून शेतकऱ्याची मशागत अंतिम टप्प्यात पोहचली आहे. पाचोडसह परिसरात शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. गडचिरोली जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर सुरूच आहे. शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकरी, तेंदू ठेकेदार आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील चार दिवस पावसाचा इशारा दिला असून, 'ऑरेंज अलर्ट' जारी करण्यात आला आहे.