Pune Unseasonal Rain: उन्हाच्या चटक्यांनी हैराण झालेल्या पुणेकरांना आज पावसाने काहीसा दिलासा दिला खरा, मात्र या अवकाळी पावसामुळे शहराची चांगलीच दैना उडाली. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात दुपारी अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांची मोठी धावपळ झाली. विशेषतः बाणेर आणि बालेवाडी परिसरात गारांचा पाऊस पडल्याने रस्त्यावर पांढरी चादर पसरली होती. शिवाजीनगर, पुणे स्टेशन, हडपसर, लोणी काळभोर आणि औंध परिसरात पावसाने सुमारे अर्धा तास जोरदार हजेरी लावली, ज्यामुळे सखल भागात पाणी साचले आणि चाकरमान्यांची मोठी फजिती झाली.
विदर्भातही अवकाळीचा फटका; बळीराजा धास्तावला
केवळ पश्चिम महाराष्ट्रच नव्हे, तर विदर्भातील वाशिम जिल्ह्यालाही पावसाने लक्ष्य केले आहे. रिसोड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे काढणीला आलेल्या कांदा, आंबा आणि फळबागांचे अतोनात नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. हाता तोंडाशी आलेला घास या पावसामुळे हिरावला जाण्याची शक्यता असल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, कृषी क्षेत्रासमोर मोठे संकट उभे राहिले आहे.
हेही वाचा - Maharashtra Agriculture Funding: राज्याच्या कृषी विभागाचा केंद्रात डंका; काम पाहून 33 कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर, कसा होणार फायदा? वाचा
हवामान विभागाकडून अलर्ट
भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील हवामानातील हा बिघाड पुढील काही दिवस कायम राहणार आहे. या काळात ताशी 30 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून पावसाची तीव्रता अधिक वाढणार असून खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी या बदलत्या हवामानाचा अंदाज घेऊन योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.