पुणे : शहरातील नामांकित मिठाई उत्पादक दादूज स्वीट मार्ट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कॅम्प येथील शाखेतून खरेदी केलेल्या मिठाईत मानवी नखाचा तुकडा सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर दादूज मिठाईच्या स्वच्छता आणि गुणवत्ता नियंत्रणाबद्दल गंभीर शंका व्यक्त केल्या जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने दिवाळीच्या निमित्ताने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी जवळपास ₹75,000 किमतीची मिठाई दादू’जच्या कॅम्प येथील दुकानातून घेतली होती. मात्र, मिठाईचा आस्वाद घेत असताना एका कर्मचाऱ्याला काजू कतलीच्या तुकड्यात मानवी नखाचा अंश आढळला. हा प्रकार लक्षात येताच उपस्थितांमध्ये संतापाचा वातावरण पसरले.
तक्रारदाराने तत्काळ दुकानाशी संपर्क साधला असता, दुकानातील कर्मचाऱ्यांनी या प्रकरणाकडे दुर्लक्ष केल्याचे सांगितले जाते. कोणतीही क्षमायाचना किंवा जबाबदारी स्वीकारण्यास कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने संबंधित व्यावसायिकाने अखेर अन्न व औषध प्रशासनाकडे (FDA) अधिकृत तक्रार दाखल केली.
हेही वाचा: PM Kisan Yojana: आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात
याच आठवड्यात अशाच प्रकारची दुसरी घटना घडल्याचा आरोपही समोर आला आहे. ध्रुव मेहता नावाच्या ग्राहकाने सोशल मीडियावर पोस्ट करताना सांगितले की, दादूजमधून घेतलेल्या मोतीचूर लाडूमध्ये केस आढळले, पण दुकान व्यवस्थापनाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
सलग घडणाऱ्या या घटनांमुळे पुणेकरांमध्ये नाराजी व्यक्त केली जात असून, ग्राहक सुरक्षेच्या आणि अन्न स्वच्छतेच्या दृष्टीने हा गंभीर मुद्दा बनला आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात मोठ्या प्रमाणावर मिठाई विक्री होत असताना अशा घटना ग्राहकांचा विश्वास डळमळीत करणाऱ्या ठरत आहेत.
FDA कडून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच नागरिकांनीही अन्नपदार्थांतील अशुद्धता किंवा स्वच्छतेतील त्रुटी आढळल्यास तात्काळ तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
हेही वाचा: Pune University Flyover: युनिव्हर्सिटी चौकातील उड्डाणपूल प्रकल्प पूर्णतेकडे; प्रवाशांना मिळणार दिलासा