पुणे : आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातून गुन्हेगारीची घटना समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय विनोदे यांचा मुलगा अजिंक्य विनोदे यांच्यावर रविवारी दुपारी प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने संपूर्ण पुणे जिल्हा आणि राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अजिंक्य विनोदे हे हिंजवडीतील जुन्या जकात नाका परिसरातील ‘बेलबॉटम’ नावाच्या हॉटेलमध्ये भाडेवसूलीसाठी गेले होते. त्यावेळी त्यांचा हॉटेलमधील भाडेकरूंशी वाद झाला. हा वाद एवढा तीव्र झाला की, संतापलेल्या भाडेकरूंनी चाकू व धारदार शस्त्रांचा वापर करून अजिंक्य विनोदे यांच्यावर हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यात अजिंक्य गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचा : Ranjit Kasle Arrested: लातूरमध्ये माजी पोलीस अधिकारी रणजीत कासलेला गुजरात पोलिसांनी ठोकल्या बेड्या; 'मै झुकुंगा नही’ स्टाईलमध्ये कासलेचा अटकेला प्रतिसाद!
घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि काही आरोपींना तत्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी आतापर्यंत सुमित सदाशिव, विकी तीपाले, अथर्व शिंदे, गौतम कांबळे, समाधान आणि बंटी ठाकूर या सहा जणांना अटक केली आहे. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, या आरोपींपैकी काही जणांवर याआधी सुद्धा गुन्हे दाखल झाले असून, त्यांच्यावर तडीपारीची कारवाई देखील झाली होती. सध्या उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू असून, पोलिसांनी या प्रकरणी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले आहेत.
या हल्ल्याची पार्श्वभूमी अजून स्पष्ट झालेली नसली तरी, प्राथमिक तपासात हा वाद भाडेवसूलीशी संबंधित असल्याचे समोर आले आहे. हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केला असून, पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
दरम्यान, अजिंक्य विनोदे यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच, त्यांच्या वडिलांचे जवळचे सहकारी आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते रुग्णालयात दाखल झाले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या धनंजय विनोदे यांच्या कुटुंबावर झालेल्या या हल्ल्यामुळे राजकीय वातावरण तापले असून, ही घटना नेमकी कोणत्या कारणाने घडली याबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
हेही वाचा : Medha Kulkarni: 'शनिवार वाड्यात नमाज पठण करणाऱ्यांना सोडणार नाही', खासदार मेधा कुलकर्णींनी दिला इशारा