नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय कॅबिनेट बैठकीत पुणेकरांसाठी एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या टप्पा-2 ला अधिकृत मंजुरी देण्यात आली असून, वनाझ ते चांदणी चौक (कॉरिडॉर 2अ) आणि रामवाडी ते वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2ब) या मार्गांचा समावेश असलेला हा टप्पा पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीसाठी क्रांतिकारी ठरणार आहे.
13 स्थानकांचा समावेश, 12.75 किमीचा विस्तार
वनाझ-रामवाडी या विद्यमान कॉरिडॉरचा हा विस्तार असून, एकूण लांबी 12.75 किमी इतकी आहे. या दोन उन्नत कॉरिडॉरमध्ये एकूण 13 स्थानकांचा समावेश असेल, जी चांदणी चौक, बावधन, कोथरूड, खराडी आणि वाघोलीसारख्या जलदविकसनशील भागांना जोडणार आहेत. हे काम पुढील चार वर्षांत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
हेही वाचा: शेतकऱ्यांना मोठा दिलासा; ऑगस्टपासून शेतकऱ्यांना मिळणार व्हॉट्सॲपवर सातबारा
3626.24 कोटींचा खर्च, संयुक्त भागीदारी
या प्रकल्पासाठी अंदाजे खर्च 3626.24 कोटी रुपये असून, हा खर्च केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार आणि विविध बाह्य द्विपक्षीय/बहुपक्षीय संस्थांमध्ये वाटून घेतला जाणार आहे.
वाहतुकीला नवा आयाम, इंटरचेंज सुविधेने प्रवास अधिक सुलभ
या नवीन कॉरिडॉरद्वारे जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनवर लाईन-1 (निगडी-कात्रज) आणि लाईन-3 (हिंजवडी-जिल्हा न्यायालय) ला जोडले जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना अखंड मल्टीमॉडल प्रवासाचा अनुभव घेता येईल.
हेही वाचा:राम मंदिराच्या काही कारणामुळे नालासोपाऱ्यातील दोन शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
दैनंदिन प्रवासी संख्येत मोठी वाढ अपेक्षित
या प्रकल्पामुळे सार्वजनिक वाहतुकीचा वाटा वाढण्यास मदत होणार आहे. 2027 मध्ये 0.96 लाख, 2037 मध्ये 2.01 लाख, 2047 मध्ये 2.87 लाख आणि 2057 मध्ये तब्बल 3.49 लाख प्रवासी दररोज या मार्गाचा वापर करतील, असा अंदाज आहे.
महत्त्वाचे फायदे:
IT हब, व्यवसायिक केंद्रे, शैक्षणिक संस्था व निवासी भागांना मेट्रोने जोडले जाणार
पौड रोड व नगर रोडवरील वाहतूक कोंडी कमी होणार
प्रवाशांना मुंबई, बेंगळुरू, औरंगाबाद व इतर शहरांतील बस स्थानकांपासून थेट मेट्रोशी जोडणी मिळणार
पर्यावरणपूरक आणि जलद प्रवासासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
महामेट्रोकडून कामाची जबाबदारी
या प्रकल्पाची संपूर्ण अंमलबजावणी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) करणार आहे. सर्व सिव्हिल, इलेक्ट्रो-मेकॅनिकल आणि इतर बांधकामांचे काम यांच्याकडे असेल. सध्या स्थलाकृतिक सर्वेक्षण आणि डिझाइनची पूर्वतयारी सुरु आहे.
शाश्वत पुण्यासाठी महत्त्वपूर्ण टप्पा
हा धोरणात्मक विस्तार केवळ मेट्रो प्रकल्पापुरता मर्यादित नसून, पुण्याच्या भविष्यातील वाहतूक पायाभूत सुविधांमध्ये महत्त्वाची भर घालणार आहे. पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि गतिशील शहर घडवण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा ठरणार आहे.