पुणे: पुणे महानगरपालिकेच्या राजकारणाने आता वेग घेतला असून, बहुमतात आलेल्या भारतीय जनता पक्षाने आपल्या अनुभवी शिलेदारावर विश्वास टाकला आहे. माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांची भाजपच्या गटनेतेपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या नियुक्तीची घोषणा केली असून, आज शनिवारी सर्व नवनिर्वाचित नगरसेवक विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन आपल्या गटाची अधिकृत नोंदणी करणार आहेत. बिडकरांच्या अनुभवाचा फायदा घेत महापालिकेत भाजपचा दबदबा कायम ठेवण्याची रणनीती यामागे असल्याचे बोलले जात आहे.
पुणे महापालिकेत जास्त जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवणाऱ्या भाजपचा गटनेता हाच सभागृह नेता असणार आहे. या पदासाठी शहराध्यक्ष धीरज घाटे, श्रीनाथ भिमाले आणि गणेश बिडकर अशी प्रबळ नावे चर्चेत होती. मात्र, घाटे यांच्याकडे सध्या शहराध्यक्षपदाची धुरा असल्याने 'एक व्यक्ती, एक पद' या सूत्रानुसार बिडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. बिडकरांची ही तिसरी टर्म असून, यापूर्वीही त्यांनी सभागृह नेते आणि स्थायी समितीचे अध्यक्षपद भूषवले असल्याने प्रशासनावरील त्यांची पकड मजबूत मानली जाते.
हेही वाचा: ऑफिसमध्ये आयकराचा छापा अन् केबिनमध्ये मालकाने संपवलं स्वत:चं आयुष्य, CJ Roy यांच्यासोबत नेमकं काय घडलं?
गटनेतेपदाचा पेच सुटला असला तरी, आता खरी 'रंगत' ही स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी पाहायला मिळणार आहे. गणेश बिडकर गटनेते झाल्यामुळे आता श्रीनाथ भिमाले आणि राजेंद्र शिळीमकर यांनी स्थायी समितीचे अध्यक्षपद पटकावण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महापालिकेची तिजोरी ज्या समितीच्या हातात असते, त्या 'स्थायी'चे अध्यक्षपद मिळवण्यासाठी भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये आता 'कोल्ड वॉर' सुरू झाले असून, पक्षश्रेष्ठी कोणाच्या पारड्यात वजन टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
दुसरीकडे, विरोधात असलेल्या महाविकास आघाडीच्या गोटातही हालचालींना वेग आला आहे. हडपसर-सातववाडी प्रभागातून निवडून आलेले शिवसेनेचे (उबाठा) एकमेव नगरसेवक नितीन गावडे हे आता महापालिकेत शिवसेनेचा आवाज बुलंद करतील. एकमेव नगरसेवक असल्याने तेच शिवसेनेचे गटनेते असतील, ज्यामुळे शिवसेनेला पालिकेच्या मुख्य इमारतीत स्वतःचे कार्यालय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) अनुभवी नीलेश निकम यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाने काका चव्हाण यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे.
विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक गटस्थापनेसाठी एकत्रितपणे विभागीय आयुक्तांसमोर जाणार आहेत. यामुळे सभागृहात भाजपच्या एकहाती सत्तेला रोखण्यासाठी विरोधक नेमकी काय रणनीती आखतात, याकडे पुणेकरांचे लक्ष लागले आहे. "पुण्यातील राजकारणात अनुभवी नेत्यांना संधी देऊन भाजपने बाजू भक्कम केली असली, तरी अंतर्गत स्पर्धा आणि आक्रमक विरोधक यामुळे आगामी पाच वर्षांचा प्रवास महत्वाचा ठरणार," अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
हेही वाचा: Sunetra Pawar: भल्या पहाटे सुनेत्रा पवार मुंबईत दाखल, आज घेणार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ