पुणे: पुणे महानगरपालिकेच्या रणसंग्रामात भारतीय जनता पक्षाने सर्व विरोधकांचे मनसुबे उधळून लावत एकतर्फी विजय संपादन केला आहे. 165 जागांपैकी तब्बल 90 जागांवर विजय मिळवत भाजपने पुणे महापालिकेवर आपला भगवा फडकवला आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर एकत्र आलेल्या पवार काका पुतण्यांच्या शक्तीला हा मोठा धक्का मानला जात असून, पुण्याच्या राजकारणातील अनेक मातब्बर नेत्यांना या निवडणुकीत धूळ चाखावी लागली आहे. मतदारांनी प्रस्थापित चेहऱ्यांऐवजी भाजपच्या ‘लाटेला’ पसंती दिल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे.
धंगेकर कुटुंबाला बसला दुहेरी फटका
कसबा पोटनिवडणुकीत जायंट किलर ठरलेले रवींद्र धंगेकर यांच्यासाठी हा निकाल अत्यंत क्लेशदायक ठरला आहे. निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेत प्रवेश करूनही धंगेकरांना आपली जादू टिकवता आली नाही. प्रभाग क्रमांक 24 मध्ये त्यांचे चिरंजीव प्रणव धंगेकर यांचा भाजपच्या गणेश बीडकर यांनी पराभव केला. तर दुसरीकडे, प्रभाग क्रमांक 23 मध्ये रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांना जेलमधून निवडणूक लढवणाऱ्या सोनाली आंदेकर यांनी पराभवाचा धक्का दिला. धंगेकर कुटुंबाचा हा पराभव म्हणजे “घर फिरले की घराचे वासेही फिरतात” अशीच काहीशी स्थिती निर्माण करणारा ठरला आहे.
हेही वाचा: Parbhani Election Result: परभणीत ठाकरेंचा 'गनिमी कावा'; भाजप-शिंदेंची लाट रोखण्यात शिवसेनाच्या या शिलेदाराला यश
रुपाली ठोंबरेंचा दोन्ही प्रभागांत ‘नॉट रिचेबल’ निकाल
अजित पवार गटाच्या आक्रमक नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांच्यासाठी ही निवडणूक दुर्दैवी ठरली. प्रभाग क्रमांक 25 आणि 26 अशा दोन ठिकाणांहून त्यांनी नशीब आजमावले होते, मात्र दोन्ही प्रभागांतील मतदारांनी त्यांना नाकारले. मतमोजणीदरम्यान त्यांनी ईव्हीएम मशिनमध्ये फेरफार झाल्याचा आरोप करत गोंधळ घातला, ज्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, प्रशासनाने सर्व आक्षेप फेटाळत निकाल जाहीर केला आणि ठोंबरेंना दुहेरी पराभवाचा झटका सहन करावा लागला.
वसंत मोरेंचा ‘फायरब्रँड’ करिष्मा ओसरला?
पुणे महापालिकेतील आणखी एक हायव्होल्टेज लढत म्हणजे वसंत मोरे यांची होती. ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मोरेंनी स्वतःसह मुलगा रुपेश मोरेलाही रिंगणात उतरवले होते. संजय राऊतांच्या सभा होऊनही कात्रजच्या मतदारांनी मोरेंना नाकारले. प्रभाग 40 मध्ये भाजपच्या रंजना टिळेकर यांनी रुपेश मोरेंचा पराभव केला, तर खुद्द वसंत मोरे यांना प्रभाग 38 मधून 1011 मतांच्या निसटत्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. “दुसऱ्याला कात्रजचा घाट दाखवणाऱ्या मोरेंना मतदारांनीच कात्रजचा घाट दाखवला,” अशी चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुण्यात पुन्हा ‘भाजपमय’ वातावरण
या निकालाने पुण्याच्या राजकारणातील अनेक समीकरणे बदलली आहेत. 90 जागा जिंकून भाजपने केवळ सत्ता मिळवली नाही, तर विरोधकांच्या गडांना सुरुंग लावला आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या एकत्र येण्याने महाविकास आघाडीला जे बळ मिळेल अशी अपेक्षा होती, ती पुण्यात फोल ठरली आहे. भाजपची संघटित बांधणी आणि मायक्रो प्लॅनिंगसमोर विरोधकांचा ‘आक्रमकपणा’ सपशेल अपयशी ठरल्याचे दिसत आहे.
पुण्यातील या विजयाने आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपचा आत्मविश्वास द्विगुणित झाला असून, विरोधकांसाठी मात्र हा निकाल ‘चिंतन’ करायला लावणारा ठरला आहे.
हेही वाचा: Atul Kulkarni : निवडणूक निकालांच्या धामधुमीत अतुल कुलकर्णींची पोस्ट चर्चेत; 6 शब्दांत मांडलं महाराष्ट्राच्या राजकारणाचं 'सार'