Monday, May 11, 2026 12:18:14 PM

Pune PMP Bus: पुणे पीएमपीचा अजब कारभार; जिथे ट्रॅफिक जास्त, तिथली बस सेवा कायमची बंद? धक्कादायक खुलासा समोर

माहिती अधिकार कार्यकर्ते तुषार रत्नपाल यांनी पीएमपीकडे बस मार्ग सुरू किंवा बंद करण्याच्या निकषांबाबत माहिती मागितली होती.

pune pmp bus पुणे पीएमपीचा अजब कारभार जिथे ट्रॅफिक जास्त तिथली बस सेवा कायमची बंद धक्कादायक खुलासा समोर

Pune PMP Bus: पुण्यातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे गरजेचे असताना, 'पीएमपी' प्रशासनाने मात्र उलटी गंगा वाहू दिली आहे. ज्या रस्त्यांवर सर्वाधिक वाहतूक कोंडी होते, त्याच मार्गावरील बस सेवा बंद करण्याचे धक्कादायक धोरण पीएमपीने स्वीकारले आहे. एका 'RTI' (माहिती अधिकार) अर्जाद्वारे ही माहिती समोर आल्याने प्रवाशांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

काय आहे नवा वाद?
माहिती अधिकार कार्यकर्ते तुषार रत्नपाल यांनी पीएमपीकडे बस मार्ग सुरू किंवा बंद करण्याच्या निकषांबाबत माहिती मागितली होती. प्रशासनाने दिलेल्या उत्तरात 'सतत होणारी वाहतूक कोंडी' हे मार्ग बंद करण्याचे एक मुख्य कारण असल्याचे मान्य केले आहे. वास्तविक, रस्त्यांवरील खासगी वाहने कमी व्हावीत यासाठी कोंडीच्या ठिकाणी अधिक बस सोडणे अपेक्षित असताना, पीएमपीने थेट सेवाच बंद करण्याचा पवित्रा घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

पीएमपीचे विचित्र निकष
प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मार्ग बंद करताना खालील बाबींचा विचार केला जातो:
कोंडीचे कारण: ज्या मार्गावर सतत ट्रॅफिक जाम असते, तिथली सेवा तोट्यात किंवा विलंबाने चालते असे सांगून ती बंद केली जाते.
आर्थिक व्यवहार्यता: कमी उत्पन्न देणारे मार्ग किंवा प्रवाशांची घटलेली संख्या.
पर्यायी व्यवस्था: मेट्रो किंवा इतर बस सेवा उपलब्ध असल्यास जुने मार्ग गुंडाळले जातात.
इतर कारणे: रस्त्यांची दुरवस्था, सुरक्षेचे प्रश्न आणि प्रवाशांच्या तक्रारी.

राजकीय दबावाचा 'ब्रेक'
मिळालेल्या माहितीनुसार, सध्या पीएमपीकडे बसची संख्या अपुरी आहे. अशा परिस्थितीत नवीन मार्ग सुरू करण्यासाठी राजकीय वजन वापरले जाते. एखाद्या वजनदार लोकप्रतिनिधीचा फोन आल्यास नवीन भागात बस सुरू केली जाते. मात्र, ताफ्यात पुरेशा बस नसल्यामुळे ही नवीन सेवा सुरू करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या सुरू असलेल्या मार्गाचा बळी दिला जातो. यामुळे नियमित प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे.

हेही वाचा - Most Expensive Toll: महाराष्ट्रात देशातील सर्वात महागडा टोलनाका; टोलचे दर ऐकून तुम्हालाही फुटेल घाम

धोरणाचा उलट परिणाम
वाहतूक तज्ज्ञांच्या मते, कोंडीच्या मार्गावर बस सेवा बंद केल्यामुळे नागरिक नाईलाजाने स्वतःची दुचाकी किंवा चारचाकी बाहेर काढतात. यामुळे रस्त्यावर खासगी वाहनांची संख्या वाढून कोंडीचा प्रश्न अधिकच जटील बनत आहे. प्रशासनाचा हा 'शॉर्टकट' पुण्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला खिळखिळी करणारा ठरत आहे.
 


सम्बन्धित सामग्री