Tuesday, November 18, 2025 10:34:35 PM

RTO HSRP Installation: एचएसआरपी बसवण्यात पुणे आरटीओ राज्यात सगळ्यात पुढे; 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत बसवा नंबर प्लेट अन्यथा होईल ही कारवाई ....

पुणे आरटीओ राज्यात एचएसआरपी मोहिमेत अव्वल ठरला असून, 30 नोव्हेंबरपर्यंतच मुदत देण्यात आली आहे; त्यानंतर दंडात्मक कारवाई सुरू होणार आहे.

rto hsrp installation एचएसआरपी बसवण्यात पुणे आरटीओ राज्यात  सगळ्यात पुढे 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत बसवा नंबर प्लेट अन्यथा होईल ही कारवाई

राज्यात वाहन सुरक्षेसाठी लागू करण्यात आलेल्या उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (High Security Registration Plate) मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रभरात 60 टक्के आणि मुंबईमध्ये तब्बल 66 टक्के वाहनांना एचएसआरपी प्लेट बसवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे, या मोहिमेत पुणे आरटीओ विभाग राज्यात आघाडीवर आहे.

30 नोव्हेंबर ही एचएसआरपी बसवण्याची अंतिम मुदत जाहीर करण्यात आली असून, त्यानंतर 1 डिसेंबरपासून वायुवेग पथकांकडून कठोर दंड आकरण्यात येणार आहे. एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर दंड आकारला जाईल, तसेच अशा वाहनांची पुनर्नोंदणी, वाहनातील फेरफार बदल आणि परवान्याचे रिन्युअल या सुविधा बंद केल्या जातील.

मुंबईतील चार आरटीओ कार्यालयांपैकी अंधेरी आरटीओ विभागात 83 टक्के वाहनांवर एचएसआरपी बसवण्यात आली आहे, तर वाशी आरटीओ क्षेत्रात 90 टक्के पेक्षा जास्त वाहनांनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. पुणे आरटीओ विभागानेही राज्यात सर्वाधिक वाहनांना एचएसआरपी बसवून आघाडी कायम ठेवली आहे.

हेही वाचा : Tata Trust: टाटा ट्रस्टचा महत्वपूर्ण निर्णय : वेणू श्रीनिवासन यांची आजीवन नियुक्ती; विश्वस्तांमधील मतभेद मिटवण्याचा प्रयत्न

परिवहन खात्याच्या माहितीनुसार, राज्यातील अनेक जुनी वाहने भंगार स्थितीत किंवा जप्त अवस्थेत आहेत. अनेक वाहने खासगी पातळीवर मोडीत काढली गेली असून त्यांची अधिकृत नोंद शासनाकडे नाही. त्यामुळे राज्यातील सर्व जुन्या वाहनांवर एचएसआरपी बसवणे आव्हानात्मक ठरणार असल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

दरम्यान, HSRP नंबरप्लेट बसवण्यासाठी अपॉइंटमेंट घेणाऱ्यांचा प्रतिसाद वाढत असला तरी, नंबरप्लेटच्या उपलब्धतेत विलंब होत आहे. काही वाहनधारकांनी सांगितले की, “अपॉइंटमेंट घेतलेल्या दिवशी सेंटरवर पोहोचलो तरी नंबरप्लेट उपलब्ध नसल्याने बसवण्यात विलंब होतो.” रविवारी सेंटर सुरु नसल्याने नागरिकांना अन्य दिवसांवर अपॉइंटमेंट घ्यावी लागत आहे.

परिवहन विभागाने स्पष्ट केलं आहे की, एचएसआरपी बसवणं ही वाहन सुरक्षेसाठी अत्यावश्यक बाब आहे. त्यामुळे वाहनधारकांनी वेळेत ही प्रक्रिया पूर्ण करून शासनाच्या नियमांचे पालन करावे. 30 नोव्हेंबरनंतर कारवाई सुरू झाल्यावर दंड, वाहन नूतनीकरणावरील अडथळे आणि इतर प्रशासकीय अडचणी टाळण्यासाठी लवकरात लवकर एचएसआरपी बसवणं हाच एकमेव उपाय असल्याचे विभागाने अधोरेखित केले आहे.

हेही वाचा: Vashi Building Fire : कामोठेपाठोपाठ वाशीमध्ये रहिवासी इमारतीमध्ये भीषण आग ; चौघांचा मृत्यू


सम्बन्धित सामग्री