Uddhav Thackeray: जागतिक स्तरावर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता महाराष्ट्राच्या स्वयंपाकघरात उमटू लागले आहेत. राज्यात निर्माण झालेल्या घरगुती गॅस सिलिंडरच्या तीव्र टंचाईवरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "जर साठा पुरेसा आहे, तर मग जनता रस्त्यावर रांगेत का उभी आहे?" असा बोचरा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
'सामान्यांची व्यथा न कळणारे मुख्यमंत्री'; ठाकरेंचे टीकास्त्र
नवी मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत आणि वाशीमसारख्या ग्रामीण जिल्ह्यांमध्येही सध्या सिलिंडरचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी सरकारचा 'पुरेसा साठा' असल्याचा दावा खोडून काढला. "मला मिळालेल्या माहितीनुसार, गॅसअभावी मुंबईतील 30 ते 40 टक्के रेस्टॉरंट्स बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. जर ही परिस्थिती मुख्यमंत्र्यांना दिसत नसेल, तर त्यांच्या यंत्रणेत मोठा गलथानपणा आहे. जनतेची दुःखं समजून न घेणाऱ्या नेतृत्वामुळे राज्याचं भवितव्य कठीण आहे," अशा शब्दांत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
मोदींच्या 'त्या' प्रयोगाचा उल्लेख करत टोला
गॅसची दरवाढ आणि टंचाई या दोन वेगवेगळ्या गोष्टी असल्याचे सांगत ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही चिमटा काढला. "पंतप्रधानांनी सुचवलेला गॅस निर्मितीचा प्रयोगही करून पाहिला, तरीही टंचाई का कमी होत नाही? या प्रश्नाचे उत्तर सरकारने द्यायला हवे," असे ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय युद्धाच्या नावाखाली जनतेला वेठीस धरले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - Eknath Shinde : एकनाथ शिंदेची नाराजी? तडकाफडकी दिल्लीला रवाना, अमित शाहांची घेणार भेट
विरोधी पक्षनेत्याच्या नियुक्तीसाठी अध्यक्षांच्या भेटीला
केवळ गॅस टंचाईच नव्हे, तर विधानमंडळातील घटनात्मक पदांच्या रिक्त जागेवरूनही उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत. विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद अद्याप रिक्त असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. या नियुक्तीसाठी आज त्यांनी विरोधी पक्षातील इतर नेत्यांसह विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. वारंवार पत्रव्यवहार करूनही सरकार जाणीवपूर्वक ही पदे भरण्यास विलंब करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.