Mumbai Local Train Latest News : मुंबईतील लाखो प्रवाशांचा प्रवास सुखकर करण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने कंबर कसली आहे. सध्याच्या लोकल गाड्यांचे पूर्ण होत चाललेले आयुर्मान आणि प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने 100 नव्या विना-वातानुकूलित (Non-AC) लोकल गाड्यांसाठी रेल्वे मंडळाला (Railway Board) पत्र पाठवले आहे.
100 नव्या लोकलचे नियोजन
मुंबई उपनगरी रेल्वेच्या जाळ्यात सध्या मोठे बदल होत असून सुमारे 400 किलोमीटर लांबीचे विविध प्रकल्प सुरू आहेत. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या अनेक लोकल गाड्यांनी त्यांचे निश्चित आयुर्मान पूर्ण केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या जुन्या गाड्या बदलणे अनिवार्य आहे. जरी 238 नवीन एसी (AC) लोकलची निविदा प्रक्रिया सुरू असली, तरी पहिली एसी लोकल 2030 पर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणारी 'साधी' लोकल सेवा अखंडित ठेवण्यासाठी या नव्या 100 गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. एमयूटीपी प्रकल्पांतर्गत मुंबई उपनगरी रेल्वेचा विस्तार होत असलेले लक्षात घेऊन, हे नियोजन केले आहे. यामुळे लाखो प्रवाशांची सोय होणार आहे.
प्रकल्प पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागणार?
मुंबईतील रेल्वे प्रकल्पांसाठी एकूण 18,364 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून, पुढील 4 वर्षांत हे प्रकल्प पूर्ण होणार आहेत.
मध्य रेल्वे (Central Railway):
सीएसएमटी-कुर्ला 5 वी- 6 वी मार्गिका 2019
पहिला टप्पा - परळ-कुर्ला (10.1 किमी)
दुसरा टप्पा परळ-सीएसएमटी (7.4 किमी)
नवा पनवेल-कर्जत मार्ग (29.6 किमी): मे 2026
कल्याण-आसनगाव 4 मार्गिका (32 किमी) डिसेंबर 2026
कल्याण-बदलापूर 3 री व 4 थी मार्गिका (14.5 किमी) : डिसेंबर 2026
कल्याण-कसारा 3 री मार्गिका (67 किमी) : डिसेंबर 2026
बदलापूर-कर्जत 3 री व 4 थी मार्गिका (32 किमी) : वर्ष 2030
आसनगाव-कसारा 4 थी मार्गिका (35 किमी) : वर्ष 2027
पश्चिम रेल्वे (Western Railway):
मुंबई सेंट्रल-बोरिवली 6 वी मार्गिका (30 किमी) अंशतः पूर्ण
गोरेगाव-बोरिवली हार्बर विस्तार (7.8 किमी) : डिसेंबर 2028 (गोरेगाव-मालाड : मार्च 2028 आणि मालाड-बोरिवली डिसेंबर 2028)
विरार-डहाणू 3 री व 4 थी मार्गिका (64 किमी) : डिसेंबर 2026
बोरिवली-विरार 5 वी व 6 वी मार्गिका (26 किमी) : मार्च 2028
नायगाव - जुचंद्र दुहेरी कॉर्ड लाइन प्रकल्प (6 किमी) : मार्च 2028
हेही वाचा - Megablock On Mumbai Local : मुंबईकरांनो रेल्वेचं वेळापत्रक बघा; नंतर करा रविवारच्या प्रवासाचं नियोजन
12 डब्यांच्या गाड्या होणार 15 डब्यांच्या
प्रवासी क्षमता वाढवण्यासाठी रेल्वेने आता आपल्या बहुतांश गाड्या 15 डब्यांच्या करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. सध्या मध्य रेल्वेवर दररोज 1820 फेऱ्यांसाठी 134 गाड्या उपलब्ध आहेत, तर पश्चिम रेल्वेवर 1406 फेऱ्यांसाठी 96 गाड्या धावतात. नव्या 100 गाड्या दाखल झाल्यामुळे फेऱ्यांची संख्या वाढून प्रवाशांची गर्दी विभागण्यास मोठी मदत होणार आहे. याशिवाय, मुंबई रेल्वे विकास महामंडळाने आणखी 238 वातानुकूलित लोकल गाड्यांसाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. यातील पहिली एसी लोकल धावण्यासाठी सन 2030 उजाडण्याची शक्यता आहे. यामुळे विना-वातानुकूलित लोकल गाड्यांची आवश्यकता आहे.
सुरक्षा आणि आधुनिक सुविधा
नव्याने येणाऱ्या साध्या लोकलमध्ये काही महत्त्वाचे बदल केले जाणार आहेत. सुरक्षिततेसाठी या गाड्यांना मेट्रोप्रमाणे 'ऑटोमॅटिक डोअर्स' (Automatic Doors) बसवण्याबाबत चर्चा सुरू आहे. तसेच, अधिक रेल्वेच्या डब्यांमध्ये हवा खेळती राहण्यासाठी (Ventilation) डब्यांच्या छतावर विशेष युनिट्स बसवण्यात येणार आहेत, जेणेकरून गर्दीच्या वेळी प्रवाशांना गुदमरल्यासारखे होणार नाही.
सर्वसामान्यांचे हित जपणार
रेल्वेचे महाव्यवस्थापक विवेक कुमार गुप्ता यांच्या माहितीनुसार, रेल्वेचे प्राधान्य प्रवाशांना परवडणारी आणि सुरक्षित सेवा देणे हे आहे. एसी लोकलचा विस्तार होत असला तरी, बहुतांश मुंबईकर अजूनही साध्या लोकलला पसंती देतात. त्यामुळेच या नवीन गाड्यांची मागणी करण्यात आली आहे. या निर्णयामुळे भविष्यातील रेल्वेचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखद होण्याची आशा निर्माण झाली आहे.
हेही वाचा - Western Local Train : आता प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवरील लोकल फेऱ्यांमध्ये वाढ, नवीन वेळापत्रक समोर