AC Local Train : मुंबईकरांची लाइफलाईन असलेल्या लोकल रेल्वेला अधिक हायटेक आणि सोयीस्कर बनवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. येत्या काळात वाढणाऱ्या एसी लोकल (AC Local) गाड्यांचे नियोजन, तिकीट दरांची सुसूत्रता आणि गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी IIT मुंबईची विशेष सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
IIT मुंबई नेमका काय अभ्यास करणार?
मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) उपनगरी रेल्वेच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. वर्षभराच्या या सखोल अभ्यासात खालील मुद्द्यांवर भर दिला जाईल:
भाडेरचना निश्चिती: सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील असे एसी लोकलचे तिकीट दर ठरवणे.
वेळापत्रकाचे नियोजन: मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या सध्याच्या वेळापत्रकात कोणताही अडथळा न आणता एसी गाड्या कशा समाविष्ट करता येतील, याचा आराखडा तयार करणे.
मेट्रोशी स्पर्धा आणि समन्वय: मुंबईत विस्तारणाऱ्या ३५० किमीच्या मेट्रो जाळ्यासमोर लोकलचे वर्चस्व टिकवून ठेवण्यासाठी धोरण आखणे.
गर्दीचे नियंत्रण: एसी गाड्यांमधील वाढती गर्दी कमी करण्यासाठी तांत्रिक उपाय सुचवणे.
प्रवाशांचे मतही विचारात घेतले जाणार
केवळ तांत्रिक बाजूच नव्हे, तर जनमताचा कौलही या अभ्यासाचा भाग असणार आहे. प्रवाशांच्या अपेक्षा काय आहेत, सेवांमध्ये कोणत्या सुधारणा हव्या आहेत आणि भविष्यातील वाहतूक नियोजन कसे असावे, यासाठी स्टेकहोल्डर्सकडून सूचना मागवण्यात येणार आहेत. IIT मुंबई आपला अंतिम अहवाल सादर केल्यानंतरच एसी लोकलच्या धोरणाबाबत मोठे निर्णय घेतले जातील.
हेही वाचा - Megablock On Mumbai Local : मुंबईकरांनो रेल्वेचं वेळापत्रक बघा; नंतर करा रविवारच्या प्रवासाचं नियोजन
पश्चिम रेल्वेवर एसी फेऱ्यांचा विस्तार
एकीकडे अभ्यासाची प्रक्रिया सुरू असतानाच, प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. 26 जानेवारीपासून पश्चिम रेल्वे मार्गावर 12 अतिरिक्त एसी लोकल सुरू करण्यात आल्या आहेत.
पुढील 10 वर्षांचे व्हिजन
हा प्रकल्प केवळ तात्पुरता नसून पुढील 10 वर्षांच्या नियोजनाचा भाग आहे. लोकल सेवा अधिक सक्षम, किफायतशीर आणि जागतिक दर्जाची कशी करता येईल, याची संपूर्ण ब्ल्यू प्रिंट या अहवालातून समोर येईल.