मुंबई : राज्यात पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या ठिकठिकाणी पाऊस पडताना दिसत आहे.
पुण्याला पावसानं झोडपलं
पुण्याला पावसानं झोडपलं असून नागरिकांची तारांबळ उडताना दिसत आहे. तसेच पुण्यातील मध्यवर्ती भागात पावसाची तुफान बॅटिंग पाहायला मिळत आहे. पुणे शहराच्या उपनगर असलेल्या वाघोली परिसरात शुक्रवारी झालेल्या जोरदार मान्सून पावसाने अक्षरशः कहर केला. काही तासांमध्येच रस्त्यांवर पाणी साचल्याने चौकांमध्ये तळे निर्माण झाले, तर मुख्य रस्ते ओढ्या-नाल्यांसारखे वाहू लागले. परिणामी नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले. वाहनचालकांना त्यांच्या वाहनांची कसरत करत पुढे जाणे कठीण झाले होते. अनेक वाहनं पाण्यात बंद पडल्याचेही दृश्य पाहायला मिळाले. उपनगरातील विविध भागांमध्ये प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडलंय, सलग दुसऱ्या दिवशी या परिसरात जोरदार पाऊस बरसल्याने शेती पिकांना या पावसाचा मोठा फटका बसणार आहे. त्यामुळे बळीराजा शेतकऱ्यांची चिंता वाढलीय. तर पुण्यातील दिवेघाटात शुक्रवारी तुफान पाऊस पडला. पावसामुळे डोंगरावरून पाणी मोठ्या प्रमाणात वाहू लागले. दिवेघाटात सध्या रस्ता विस्तारीकरण सुरू आहे.
सांगलीत मुसळधार पाऊस
सांगलीत सुद्धा मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. सांगलीत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे तासगावच्या कापूर ओढ्याला पूर आला आहे. सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. तासगाव तालुक्यात मुसळधार पाऊस पडला आहे. त्यामुळे तासगाव शहरातला कापूर ओढा भरून वाहू लागलेला आहे. त्यामुळे कापूर ओढ्याला पूर परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांगली जिल्ह्यामध्ये पावसाची पुन्हा दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. सकाळी उघडीप तर सायंकाळनंतर जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी ओढे नाले हे तुडुंब भरून वाहू लागले आहेत.
हेही वाचा : बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाचा 7वा दिवस, महत्त्वाची घोषणा करणार
मनमाडमध्ये वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची हजेरी
नाशिकमधील मनमाडमध्ये रात्री आठ वाजल्यानंतर विजेचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे खरिपाच्या पेरणी कामास सुरुवात होईल तर पेरणी झालेल्या पिकांना संजीवनी मिळणार असल्याने बळीराजा सुखावला आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी पाऊस सुरू असल्याने वीज गायब झाल्याने नागरिकांनी वीज कंपनी विरोधात संताप व्यक्त केला.
बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस
मृग नक्षत्रात बुलढाणा जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मे महिन्यात मोठ्या प्रमाणात आलेल्या अवकाळी पावसानंतर जून महिन्यात पाऊस येणार की नाही या प्रश्नाने शेतकऱ्यांना चिंतेत पाडलं होतं. गेल्या काही दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने अखेर दमदार एन्ट्री मारली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, खामगाव, शेगाव तालुक्यासह ग्रामीण भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळला आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे. त्यामुळे शेतीची मशागत करून ठेवलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे..
सिंधुदुर्गात पावसाची दमदार हजेरी
सिंधुदुर्ग जिल्ह्याला आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. बरेच दिवस उसंत घेतलेल्या पावसाने जिल्ह्यातील काही भागात जोरदार हजेरी लावली आहे. सह्याद्री पट्यातील गावांमध्ये पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. रेडी रेवस सागरी महामार्गावर सकाळी दरड कोसळल्याने काही काळ वाहतूक ठप्प होती. प्रशासनाने दरड बाजूला केली. वेंगुर्ले नगरपरिषदेने गटारे न काढल्याने अनेकांच्या घरात पाणी जाण्याच्या घटना घडल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळते.