पुणे महानगरपालिका निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मोठ्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. पुण्यात मनसेला एकही जागा न मिळाल्याने पक्ष नेतृत्व गंभीर झाले असून, आता संघटनात्मक पातळीवर मोठे बदल होण्याची शक्यता आहे. पराभवाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे पुण्यात येऊन पक्षाची भाकरी फिरवणार असल्याची माहिती आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना ‘घरचा रस्ता’ दाखवला जाण्याची शक्यता असून, शहराध्यक्षांपासून स्थानिक नेत्यांपर्यंत सर्वच पातळ्यांवर फेरबदल होणार आहेत.
मनसेच्या अंतर्गत सूत्रांच्या माहितीनुसार, पराभवानंतर पक्षात आत्मचिंतन सुरू असून, नेमकी चूक कुठे झाली याचा आढावा घेतला जात आहे. पुणे शहरात संघटन मजबूत करण्यासाठी राज ठाकरे नव्या चेहऱ्यांना संधी देणार असून, जुन्या आणि निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना बाजूला करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. आगामी काळात पुण्यात मनसेचे नेतृत्व पूर्णपणे बदलण्याची तयारी सुरू आहे.
या संदर्भात राज ठाकरे पुण्यातील मनसे सैनिक आणि पदाधिकाऱ्यांसोबत विशेष बैठक घेणार आहेत. या बैठकीत निवडणूक निकालांचा सविस्तर आढावा घेतला जाईल, तसेच पुढील रणनीती ठरवली जाईल. बैठकीनंतरच अंतिम निर्णय जाहीर केला जाणार असून, कोणते नेते पदावर राहणार आणि कोणांना जबाबदारीमुक्त करण्यात येणार, यावर शिक्कामोर्तब होईल.
मनसेचे सरचिटणीस हेमंत संभूस यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्ष नेतृत्व अत्यंत गंभीरपणे परिस्थितीकडे पाहत असून, पुण्यात पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी कठोर निर्णय घेतले जाणार आहेत. पराभवातून बोध घेत नव्या जोमाने कामाला लागण्याचा निर्धार मनसेने केला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पुण्यात मनसेत मोठे बदल घडण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसत आहेत.