Tuesday, February 17, 2026 08:31:42 AM

Balasaheb Thackeray Letter: 'राज तू पुन्हा गाडी वळवलीस...' बाळासाहेबांच्या 'त्या' पत्राने शिवसैनिक गहिवरले

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांसाठी लिहिलेले एक प्रतिकात्मक पत्र. या पत्राच्या माध्यमातून जणू बाळासाहेबांनीच उपस्थितांशी संवाद साधला.

balasaheb thackeray letter राज तू पुन्हा गाडी वळवलीस बाळासाहेबांच्या त्या पत्राने शिवसैनिक गहिवरले

Balasaheb Thackeray Letter: हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त काल मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने पुन्हा एकदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर एकत्र पाहायला मिळाले. या दोन्ही भावांच्या मनोमिलनाने उपस्थित शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य पसरले.

बाळासाहेबांचे शिवसैनिकांना 'प्रतिकात्मक पत्र'

या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसैनिकांसाठी लिहिलेले एक प्रतिकात्मक पत्र. या पत्राच्या माध्यमातून जणू बाळासाहेबांनीच उपस्थितांशी संवाद साधला. "आज तुमचा शिवसेनाप्रमुख 100 वर्षांचा झाला," अशा शब्दांत पत्राची सुरुवात झाली. पत्रात बाळासाहेबांनी आचार्य अत्रे, प्रबोधनकार ठाकरे आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणींना उजाळा देत शिवसैनिकांच्या संघर्षाचे कौतुक केले.

राज-उद्धव यांच्या ऐक्यावर शिक्कामोर्तब 

पत्रात राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्याचा उल्लेख अत्यंत भावनिक रितीने करण्यात आला. "उद्धवची तब्येत खराब असताना मी राजला फोन केला आणि त्याने गाडी वळवली होती. यंदाच्या निवडणुकीत उद्धवने आवाज दिला आणि राजा तू पुन्हा गाडी वळवलीस, हे पाहून माझे डोळे पाणवले," असा उल्लेख पत्रात होता. "आदित्य आणि अमित यांना मुंबईच्या रस्त्यावर प्रचार करताना पाहून तुमचा आजोबा आनंदी झाला आहे," असे म्हणत तिसऱ्या पिढीच्या एकत्र येण्यावरही बाळासाहेबांनी समाधान व्यक्त केले.

हेही वाचा - KDMC Shivsena UBT: कल्याण - डोंबिवलीमध्ये महापौर निवडीपूर्वीच राडा; ठाकरे गटाचे दोन नगरसेवक बेपत्ता, पक्षाकडून तक्रार दाखल

मराठी अस्मिता आणि हिंदुत्व 

मुंबईतील मराठी माणसाचे अस्तित्व टिकवण्यात शिवसेनेचा मोठा वाटा असल्याचे सांगतानाच, साबीर शेख यांना मंत्रीपद आणि राज्यात पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री देण्याचे धाडस फक्त शिवसेनाच करू शकते, असे पत्रात म्हटले गेले. "शिवसेनेने काय केले?" असे विचारणाऱ्यांवर पत्रातून कडाडून टीका करण्यात आली. तसेच सध्याच्या राजकारणातील फोडाफोडीवरही नाराजी व्यक्त करण्यात आली.

उद्धव ठाकरे झाले भावूक

दरम्यान, हे पत्र वाचून दाखवत असताना व्यासपीठावर उपस्थित असलेले उद्धव ठाकरे भावूक झाले होते. पत्रातील शब्दांनी आणि बाळासाहेबांच्या आठवणींनी त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. पत्राच्या शेवटी, "कपाळावरचे निष्ठावंताचे कुंकू पुसू देऊ नका आणि 'मशाल' या चिन्हाशी प्रामाणिक राहा," असा संदेश शिवसैनिकांना देण्यात आला. या सोहळ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात 'ठाकरे' ब्रँड पुन्हा एकदा एकवटल्याचे चित्र पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला दोन्ही पक्षांचे दिग्गज नेते, पदाधिकारी आणि हजारो शिवसैनिक उपस्थित होते.
 


सम्बन्धित सामग्री