रत्नागिरी: जिल्हा परिषदेच्या 56 गटांसाठी आणि 9 पंचायत समित्यांच्या 112 गणांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. जिल्हा परिषदेसाठी 151 उमेदवार रिंगणात आहेत, तर पंचायत समित्यांसाठी 351 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. ग्रामीण राजकारणाचा कौल आज मतपेटीतून उमटणार आहे.
1693 मतदान केंद्रांवर चुरस
जिल्ह्यात एकूण 1693 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून, त्यासाठी 4286 मतदान यंत्रांची (EVM) व्यवस्था करण्यात आली आहे. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी प्रशासनाने व्यापक तयारी केली आहे. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक मतदान केंद्रांची नोंद असून, तेथील चुरस विशेष लक्षवेधी ठरत आहे.
11 लाखांहून अधिक मतदार
जिल्ह्यातील एकूण मतदारसंख्या 11 लाख 73 हजार 899 इतकी आहे. यामध्ये 5 लाख 64 हजार 976 पुरुष मतदार आणि 6 लाख 8 हजार 993 महिला मतदार आहेत. विशेष म्हणजे, जिल्ह्यात महिला मतदारांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक आहे, ही लोकशाहीसाठी सकारात्मक बाब मानली जात आहे.
हेही वाचा: Sindhudurg Zilla Parishad Election 2026 : चार वर्षांनंतर जिल्ह्याच्या राजकारणाला मिळणारा नवा श्वास; सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राजकीय इतिहास जाणून घ्या
कर्मचाऱ्यांची नेमणूक
मतदान प्रक्रियेसाठी एकूण 5455 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा आणि सुरक्षेची काळजी घेण्यात आली असून, दिवसभर शांततेत मतदान पार पाडण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.
कायदो सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यामध्ये 86 पोलीस अधिकारी, 1535 पोलीस अंमलदार, 1853 होमगार्ड, तसेच एसआरपीएफच्या दोन तुकड्या आणि आरसीपीचे दोन प्लाटून तैनात आहेत. संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे.
प्रतिष्ठेची लढत
या निवडणुकीत जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत, शेखर निकम आणि भास्कर जाधव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. विशेष म्हणजे, अनेक गटांमध्ये शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी थेट लढत रंगली असून, त्यामुळे या निवडणुकीला वेगळेच राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
निकालाकडे उत्सुकता
मतदानानंतर मतमोजणीच्या दिवशी ग्रामीण भागातील सत्तेचे समीकरण स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमधील सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण कोकणचे लक्ष लागले आहे. लोकशाहीच्या या उत्सवात मतदार मोठ्या संख्येने सहभाग घेत असून, शांततेत आणि पारदर्शकतेने मतदान प्रक्रिया पार पडत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
हेही वाचा: Zilla Parishad Election 2026: आज 12 जिल्हा परिषदांचा 'निकाल' मतपेटीत बंद होणार; सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती?