PCMC Mayor : पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात आज भाजपचा वरचष्मा पुन्हा एकदा सिद्ध झाला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सत्ताविसाव्या महापौरपदी भाजपचे रवी लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, उपमहापौर निवडीत ऐनवेळी 'ट्विस्ट' निर्माण होऊनही भाजपने बाजी मारली असून शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी वर्णी लागली आहे. शुक्रवारी पार पडलेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहकार आयुक्त दीपक तावरे यांनी ही अधिकृत घोषणा केली.
निवडणुकीत विरोधकांची माघार
महापौरपदाच्या शर्यतीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) कोणताही उमेदवार उभा न केल्याने रवी लांडगे यांचा मार्ग मोकळा झाला होता. मात्र, उपमहापौरपदासाठी राष्ट्रवादीच्या वैशाली काळभोर यांनी अर्ज भरल्याने चुरस निर्माण होईल असे वाटले होते. परंतु, ऐनवेळी काळभोर यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने उपमहापौरपदही बिनविरोध झाले.
हेही वाचा - MNS Support to Shinde Sena : उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, मनसेची 'या' महापालिकेत महायुतीसोबत हातमिळवणी
भाजपच्या गोटात ऐनवेळी नाट्यमय घडामोडी
उपमहापौरपदासाठी भाजपने सुरुवातीला निष्ठावान कार्यकर्ते शीतल उर्फ विजय शिंदे यांचे नाव निश्चित केले होते. मात्र, शिंदे महापालिकेतून निघून गेल्याने पक्षाला तातडीने निर्णय बदलावा लागला. त्यांच्या जागी शर्मिला बाबर यांचा अर्ज दाखल करण्यात आला आणि अखेर त्या उपमहापौरपदी विराजमान झाल्या.
रवी लांडगे कोण आहेत?
रवी लांडगे हे सलग दुसऱ्यांदा बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत आणि आता त्यांची महापौरपदीही बिनविरोध निवड झाली आहे. महानगरपालिकेत सलग दुसऱ्यांदा सत्ता राखणाऱ्या भाजपचे या दुसऱ्या टर्ममधील ते पहिले महापौर ठरले आहेत. 128 जागांच्या महापालिकेत बहुमतासाठी 65 जागांची गरज असताना भाजपने एकतर्फी विजय मिळवत सत्ता काबीज केली आहे.