Thursday, January 22, 2026 02:59:15 AM

Raosaheb Danve: बोगस मतदानावरून राजकारण तापलं; रावसाहेब दानवेंचा शिंदे गटाच्या आमदारावर थेट प्रहार, म्हणाले...

भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी राज्यातीलच एका शिंदे गटाच्या आमदाराचा विजय बोगस मतदारांच्या संगनमतामुळे झाल्याचा सनसनाटी दावा केला आहे.

raosaheb danve बोगस मतदानावरून राजकारण तापलं रावसाहेब दानवेंचा शिंदे गटाच्या आमदारावर थेट प्रहार म्हणाले

जालना: देशभरात बोगस मतदानाचा मुद्दा विरोधकांकडून जोरदारपणे पुढे आणला जात असताना आता सत्ताधारी पक्षातील प्रमुख नेतेही याच भाषेत बोलू लागले आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अनेक वेळा मतचोरीचे आरोप करत निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. मात्र, या चर्चेला वेगळे वळण देत भाजपचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांनी राज्यातीलच एका शिंदे गटाच्या आमदाराचा विजय बोगस मतदारांच्या संगनमतामुळे झाल्याचा सनसनाटी दावा केला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.

रावसाहेब दानवे यांनी सिल्लोडचे शिवसेना (शिंदे गट) आमदार अब्दुल सत्तार यांचा विजय सरळसरळ बोगस मतदारांवर आधारित असल्याचा गंभीर आरोप केला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजपच्या बाजूने लागतील, असा विश्वास व्यक्त करताना दानवे यांनी ज्या ठिकाणी सामाजिक समीकरण बिघडले आहे, तेथे निकालाबाबत अनिश्चितता असल्याचेही नमूद केले. मात्र, सत्तार यांच्या विजयानंतर एका वेगळ्या पद्धतीने मतदान झाले, असा संकेत त्यांनी उघडपणे दिला.

हेही वाचा: Sheetal Tejwani: रणबीर कपूरविरुद्ध शीतल तेजवानीची कोर्टात धाव; करारभंग प्रकरणी 50 लाखांची मागणी

दानवे यांनी दावा करताना सांगितले की “मी बोगस मतदारांचे ठोस पुरावे दिले आहेत, नाव एकाचे आणि फोटो दुसऱ्याचा. भोकरदनमधील तब्बल 3 हजार 200 नावे सिल्लोड मतदार यादीत दिसतात. हे सर्व पुरावे निवडणूक आयोगाकडे देणार आहे,” असे ते म्हणाले. बाहेरून मतदार आणून दोन-तीन वेळा मतदान करून घेतले तर त्यात पराक्रम नाही, अशी टीकाही त्यांनी सत्तार यांच्यावर केली. विधानसभेच्या निवडणुकीतही असेच प्रकार घडल्याचा आरोप करत, “अब्दुल सत्तार यांचा विजय बोगस मतदारांमुळेच झालाय,” असा दानवे यांचे ठाम म्हणणे आहे.

दरम्यान, काँग्रेसने ईव्हीएमवर अविश्वास व्यक्त करत निवडणुका पुन्हा बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी केली आहे. या मागणीवर प्रतिक्रिया देताना दानवे यांनी काँग्रेसवर लोकशाहीचा आदर न केल्याचा आरोप केला. “लोकशाहीवर त्यांचा भरोसा असता तर त्यांनी आणीबाणीच्या काळात विरोधी पक्षांना तुरुंगात पाठवले नसते,” अशी टीका त्यांनी केली.

या संपूर्ण घडामोडीतून राज्याच्या राजकारणात मतदान प्रक्रियेवरील अविश्वास, परस्परांवरील आरोप-प्रत्यारोप आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निर्माण होणारे ताणतणाव स्पष्टपणे जाणवत आहेत.

हेही वाचा: Microsoft India Investment: भारतामध्ये मायक्रोसॉफ्टची सर्वात मोठी गुंतवणूक! एआय क्षेत्रात तब्बल 17.5 अब्ज डॉलर्सची घोषणा


सम्बन्धित सामग्री