दिवा: दिवा परिसरात फेरीवाल्यांकडून दररोज 50 रुपये हप्ता वसूल करणाऱ्या दलालांविरुद्ध आवाज उठवल्यामुळे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख मा. रोहिदास मुंडे यांच्यावरच सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे. याच पार्श्वभूमीवर दिवा चौकी येथे मुंडे यांच्याविरोधात ऑकरन्स रिपोर्ट दाखल करण्यात आला.
या प्रकाराला विरोध करत आज कल्याण जिल्हा प्रमुख मा. दीपेश म्हात्रे आणि जिल्हा संघटक मा. तात्यासाहेब माने यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुंब्रा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा. अनिल शिंदे यांची भेट घेतली. त्यांनी फेरीवाल्यांकडून हप्ता वसूल करणाऱ्या दलालांविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करण्याची लेखी मागणी केली.
हेही वाचा: 'नटसम्राटाची भाषा बंद करा, शेतकऱ्यांसाठी...; नाना पटोलेंची फडणवीसांवर बोचरी टीका
या संदर्भात बोलताना रोहिदास मुंडे यांनी स्पष्ट सांगितले की, 'दिवा परिसरातील रस्ते आणि फूटपाथ हे नागरिकांसाठी आहेत. त्यांचा वापर हप्ता वसुलीच्या माध्यमातून अनधिकृत व्यवसायासाठी केला जातो, हे योग्य नाही. पोलिसांनी अशा दलालांना पाठीशी घालू नये. मी केवळ जनतेच्या हक्कासाठी आवाज उठवत आहे.'
या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली असून, फेरीवाल्यांच्या शोषणाविरोधात जनतेचा आवाज आता अधिक तीव्र होत आहे. पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.