Friday, March 13, 2026 07:52:41 AM

Rohit Pawar: “एफआयआर का घेतली जात नाही?” अजित पवार निधन प्रकरणावर रोहित पवार आक्रमक

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाबाबत घातपाताचा संशय व्यक्त करत रोहित पवार यांनी एफआयआर नोंदवण्यात अडथळे आणले जात असल्याचा आरोप केला आहे.

rohit pawar “एफआयआर का घेतली जात नाही” अजित पवार निधन प्रकरणावर रोहित पवार आक्रमक

मुंबई: राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या 28 जानेवारी रोजी झालेल्या अपघाती निधनानंतर राज्यातील राजकीय वातावरण अद्यापही ढवळून निघालेले असून या घटनेबाबत विविध स्तरांतून संशय व्यक्त केला जात आहे. अपघातामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नसल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यात अडथळे आणले जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी सांगितले की, या घटनेबाबत तक्रार दाखल करण्यासाठी ते मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र तेथील अतिरिक्त पोलीस उपायुक्तांनी एफआयआर नोंदवता येणार नसल्याचे सांगितल्याचा दावा त्यांनी केला. कायद्यानुसार संज्ञेय गुन्ह्यात एफआयआर दाखल करता येते, अशी वकिलांची भूमिका असतानाही तक्रार स्वीकारण्यास नकार देण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले.

रोहित पवार यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी प्रत्यक्ष लॅपटॉप घेऊन तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असताना पोलिसांकडून त्यांना रोखण्यात आले. “तुम्हाला ज्यांच्याकडे जायचे आहे तिथे जा,” असे सांगण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीच्या मृत्यूबाबत साधी नोंद करण्यास विरोध का केला जात आहे, यासंदर्भात पोलिसांना कोणत्या नेत्याचा फोन आलेला आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा: Sanjay Leela Bhansali: धक्कादायक! वाढदिवसाच्या दिवशीच प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना हृदयविकाराचा झटका? 'ही' माहिती आली समोर

दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (DGCA) अहवालाचा उल्लेख करत रोहित पवार यांनी सांगितले की संबंधित अहवालात पाच विमानांवर बंदी घालण्यात आल्याचे नमूद आहे. यावरून अप्रत्यक्षपणे यंत्रणांची चूक मान्य झाल्याचे दिसून येते, असा दावा त्यांनी केला. तरीही अधिकृत तपासासाठी एफआयआर नोंदवला जात नसल्याने संशय अधिक गडद होत असल्याचे त्यांनी म्हटले.

“सरकारकडून तपास सुरू असल्याचे सांगितले जाते, मग सीबीआय किंवा सीआयडीने नेमके काय केले? एफआयआर नोंदवण्यात अडथळा का येतो?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. सामान्य नागरिकांच्या अपघात किंवा चोरीच्या प्रकरणांमध्ये तात्काळ एफआयआर दाखल होतो, मग राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांच्या मृत्यूच्या प्रकरणात वेगळी भूमिका का घेतली जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

याप्रकरणी उद्या बारामती येथे जाऊन एफआयआर नोंदवण्याचा पुढील प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती देत त्यांनी हा लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. सत्ताधारी पक्षातील नेते या विषयावर पुढे का येत नाहीत, असा सवाल उपस्थित करत सत्य समोर येईपर्यंत प्रयत्न सुरू राहतील, असे रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा: Ajit Pawar Plane Crash : 'विमान कंपनीला वाचवण्याचा घाट...'; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप; लवकरच करणार मोठा गौप्यस्फोट


सम्बन्धित सामग्री