Saturday, May 17, 2025 08:23:30 PM

संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्ला,डाव्या पायाचा घेतला चावा; सांगलीच्या माळी गल्लीतील घटना

भिडे गुरुजी यांच्यावर माळी गल्ली भागात एका भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली.

संभाजी भिडेंवर कुत्र्याचा हल्लाडाव्या पायाचा घेतला चावा सांगलीच्या माळी गल्लीतील घटना

सांगली:  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे, ज्यांना ‘भिडे गुरुजी’ म्हणूनही ओळखलं जातं, यांच्यावर माळी गल्ली भागात एका भटक्या कुत्र्याने अचानक हल्ला केल्याची घटना सोमवारी रात्री घडली. भिडे गुरुजी एका धारकऱ्याच्या घरच्या जेवणाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन परतत असताना ही घटना घडली. रात्री सुमारे 11 वाजता घराकडे जात असताना एका कुत्र्याने त्यांच्या डाव्या पायाला जबरदस्त चावा घेतला. त्यानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

सध्या वयाच्या 80 वर्षांनंतरही भिडे गुरुजी हे अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रीय आहेत. त्यांच्या संघटनेची पायाभरणी 1980 च्या दशकात झाली असून, ती पश्चिम महाराष्ट्रात तसेच उत्तर कर्नाटकमध्ये कार्यरत आहे. शिवचरित्राचा प्रचार-प्रसार, गड-किल्ल्यांची स्वच्छता आणि राष्ट्रभक्तीच्या भावना जागवण्यासाठी ते विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. त्यांची ‘दुर्गामाता दौड’ ही तरुणांमध्ये विशेष लोकप्रिय आहे.

घटनेनंतर भिडे गुरुजींची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. या प्रकारामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये चिंता पसरली आहे. भटक्या प्राण्यांमुळे वाढत चाललेला त्रास आणि सार्वजनिक सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. स्थानिक प्रशासनाने तत्काळ कारवाई करत परिसरातील भटक्या कुत्र्यांवर नियंत्रण आणण्याची गरज असल्याचं नागरिकांकडून सांगितलं जात आहे.
 


सम्बन्धित सामग्री