R. R. Patil's Son Rohit Patil PC : दिवंगत लोकनेते आर. आर. आबा पाटील यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे सर्वात तरुण आमदार रोहित पाटील सध्या आपल्या राजकीय दौऱ्यांमुळे चर्चेत आहेत. सांगलीमध्ये आयोजित एका पत्रकार परिषदेत राजकीय प्रश्नांची सरबत्ती सुरू असतानाच, एका पत्रकाराने त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल म्हणजेच लग्नाबद्दल थेट प्रश्न विचारला. "आमदार साहेब, आता आपण विधानसभेत पोहोचलात, मग लग्नाचा विचार कधी?" या प्रश्नावर रोहित पाटील सुरुवातीला थोडे लाजले, मात्र त्यांनी अत्यंत चातुर्याने या प्रश्नाला उत्तर देऊन सर्वांची मने जिंकली.
जिल्हा परिषद निवडणुकीला प्राधान्य
लग्नाच्या प्रश्नावर स्मितहास्य करत रोहित पाटील यांनी ऐतिहासिक संदर्भाचा वापर केला. ते म्हणाले, “सध्या तरी 'आधी लगीन कोंढाण्याचं' हीच आमची भूमिका आहे; म्हणजेच माझ्यासाठी आधी जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महत्त्वाच्या आहेत.” त्यांच्या या उत्तराचा अर्थ असा होता की, वैयक्तिक आयुष्यापेक्षा त्यांनी सध्या राजकीय जबाबदाऱ्या आणि मतदारसंघातील आगामी निवडणुकांवर लक्ष केंद्रित केले आहे. या मिश्किल उत्तरानंतर पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये एकच हशा पिकला.
सर्वात तरुण आमदाराची राजकीय झेप
वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी विधानसभेत प्रवेश करून रोहित पाटील यांनी इतिहास घडवला आहे. तासगाव–कवठेमहांकाळ मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना त्यांनी आपल्या वडिलांप्रमाणेच संयमी आणि अभ्यासू नेतृत्वशैली जोपासली आहे. आर. आर. आबांचा वारसा समर्थपणे पुढे नेणारा हा तरुण नेता आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. त्यांच्या लग्नापेक्षा त्यांच्या राजकीय रणनीतीची चर्चा आता अधिक रंगू लागली आहे.
हेही वाचा - Satara News : साताऱ्यात भाजपला मोठा धक्का! ॲड. महादेव साळुंखे आता 'धनुष्यबाणा'सह निवडणुकीच्या मैदानात
आबांच्या साधेपणाची आठवण
रोहित पाटील यांच्या वागण्याबोलण्यातील साधेपणामुळे अनेकदा महाराष्ट्राला 'आबां'ची आठवण येते. पत्रकारांनी विचारलेल्या वैयक्तिक प्रश्नावर कोणतीही नाराजी न व्यक्त करता, त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिले, त्यातून त्यांच्या प्रगल्भतेचे दर्शन घडले. सोशल मीडियावरही त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून, तरुण वर्गात रोहित पाटील यांच्या या 'राजकीय कमिटमेंट'चे कौतुक केले जात आहे.
रणधुमाळीनंतरच सनई-चौघडा?
सध्या संपूर्ण सांगली जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत आपल्या गटाची सत्ता राखणे हे रोहित पाटील यांच्यापुढील मुख्य उद्दिष्ट आहे. त्यामुळे, 'कोंढाणा' जिंकल्यानंतरच म्हणजेच निवडणुकांचे निकाल लागल्यानंतरच रोहित पाटील यांच्या घरात सनई-चौघडा वाजणार का? अशी चर्चा आता त्यांच्या चाहत्यांमध्ये सुरू झाली आहे. तूर्तास तरी, रोहित पाटील यांनी आपले पूर्ण लक्ष राजकारणावर असल्याचे स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - Dr. Sarita Mhaske: 'मी ठाकरेसाहेबांसोबतच, अपहरणाच्या बातम्या...'; ठाकरे गटाच्या नगरसेविका डॉ. सरिता म्हस्के यांनी अखेर खरं काय ते सांगितलं