Navnath Ban On Sanjay Raut : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण सध्या आरोप-प्रत्यारोपांनी चांगलेच तापले आहे. शिवसेना (यूबीटी) नेते संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यांवरून केलेल्या टीकेला भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी खोचक शब्दांत उत्तर दिले आहे. नवनाथ बन यांनी एका पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर अत्यंत खोचक आणि टोकदार शब्दांत टीका केली. "संजय राऊत हे राहुल गांधींची नवरी किंवा प्रियसी म्हणून काम करत आहेत," असा खळबळजनक आरोप बन यांनी केला आहे.
'नवरी' आणि 'प्रियसी' शब्दावरून राऊतांना घेरले
संजय राऊत यांनी शिंदे यांची तुलना 'दिल्लीच्या सासरवाडीत गेलेल्या रुसलेल्या सुनेशी' केली होती. यावर पलटवार करताना नवनाथ बन म्हणाले की, "संजय राऊत स्वतः राहुल गांधींची नवरी झाले आहेत. दिल्लीत जाऊन गांधी घराण्याची गुलामी करणे हेच त्यांचे काम उरले आहे. ज्यांनी स्वतः नवरी म्हणून मांडलिकत्व पत्करले आहे, त्यांनी इतरांना सून किंवा सासू म्हणू नये. राहुल गांधींना पंतप्रधान करण्यासाठी राऊतांनी ज्या प्रकारे पायघड्या घातल्या आणि नवस बोलले, ते पाहता ते त्यांच्या प्रियसीसारखे वागत आहेत."
"उबाठा गट म्हणजे एक कॉमेडी सर्कस"
नवनाथ बन यांनी उद्धव ठाकरे गटाच्या सद्यस्थितीवर टीका करताना 'सर्कस' या शब्दाचा वापर केला. ते म्हणाले की, "उबाठा गटाच्या तंबूत आता फक्त विदूषक आणि जोकर शिल्लक आहेत. संजय राऊत रोज सकाळी उठून महाराष्ट्राचे मनोरंजन करण्याचे काम करतात. ते स्वतः 'जोकर नंबर टू' आहेत, तर त्यांचा संपूर्ण गट 'जोकर नंबर वन' आहे. ज्यांच्याकडे 52 पत्त्यांमध्ये फक्त जोकरच भरलेले आहेत, त्यांनी इतरांना गुलाम म्हणण्याचा अधिकार गमावला आहे."
हेही वाचा - Sanjay Raut : छगन भुजबळ 'क्लीन चिट' प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकारण तापलं; राऊतांचा भाजपवर 'सर्वात ढोंगी पक्ष' म्हणून पलटवार
'राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला!'
नुकत्याच झालेल्या निवडणुका आणि राज-उद्धव यांच्या भेटीवर भाष्य करताना बन यांनी गंभीर आरोप केले. "राज ठाकरे यांनी मोठ्या मनाने उद्धव ठाकरेंना साथ दिली, परंतु उबाठा गटाने नेहमीप्रमाणे राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. राज ठाकरेंच्या मदतीमुळेच उबाठा गटाच्या जागा वाढल्या, मात्र स्वतः राज ठाकरेंचे नुकसान झाले. केसाने गळा कापणाऱ्या या लोकांपासून राज ठाकरे आता दूर जातील, असे संकेत कालच्या मेळाव्यावरून मिळत आहेत," असे बन यांनी नमूद केले.
राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंचे भाषण का नाकारले?
बाळासाहेबांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात राज ठाकरे भाषण संपवून लगेच निघून गेले, यावरही नवनाथ बन यांनी भाष्य केले. "राज ठाकरे दहा मिनिटे थांबून उद्धवजींचे भाषण ऐकू शकले असते, पण त्यांना माहिती आहे की ते भाषण म्हणजे केवळ एक 'कॉमेडी सर्कस' आहे. त्यात वाघ, बिबट्या किंवा हत्ती यापलीकडे काहीही नसते. त्यामुळे ते रटाळ भाषण ऐकण्यापेक्षा नातीच्या वाढदिवसाला जाणे राज ठाकरेंनी पसंत केले. हा एक प्रकारे उद्धव ठाकरेंना दिलेला संकेतच आहे," असा दावा बन यांनी केला.
पुढचा काळ 'उबाठा' गटासाठी कठीण
शेवटी, "कल्याण-डोंबिवली तर केवळ झाँकी आहे, मुंबई आणि महाराष्ट्र अजून बाकी आहे," असे म्हणत येणाऱ्या काळात राज ठाकरे हे उद्धव ठाकरेंची साथ पूर्णपणे सोडतील आणि त्यांना धडा शिकवतील, असे भाकीत नवनाथ बन यांनी वर्तवले. एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांचे खरे शिलेदार असून ते हिंदुत्व पुढे नेत आहेत, तर राऊत आणि ठाकरे केवळ सोनिया गांधींचे दासत्व करत आहेत, अशी बोचरी टीका करत त्यांनी पत्रकार परिषद संपवली.