Wednesday, July 09, 2025 10:07:54 PM

गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही, मग महाराष्ट्रात का? राऊतांचा सवाल

हिंदी सक्तीविरोधात संजय राऊत आक्रमक; फडणवीस, शिंदे गटावर टीका करत मराठी भाषेसाठी भूमिका स्पष्ट. मराठी दुरवस्थेवर सवाल, हिंदी शाळांवरून केंद्रावर हल्ला.

गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाही मग महाराष्ट्रात का  राऊतांचा सवाल

Sanjay Raut Slams BJP: हिंदी भाषा सक्तीवरून राज्यात नव्याने वाद उफाळून आला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. 'फडणवीसांनी आजवर मराठी भाषेसाठी एकतरी बैठक घेतली का?' असा थेट सवाल करत त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे.

संजय राऊत म्हणाले, 'देवेंद्र फडणवीस हे या मराठी राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी सर्वप्रथम मराठी शाळांच्या दुरवस्थेवर काम करायला हवे. मराठी ही राज्याची शासकीय भाषा आहे. या भाषेला बळकटी देऊन मराठी माणूस सन्मानाने जगू शकेल याची काळजी त्यांनी घ्यायला हवी. अडाणी-लोढा यांचे गुलाम बनून मराठी माणूस राहणार नाही यासाठी उपाययोजना करायला हव्यात.'

हेही वाचा: 90% साहित्यिक हे पुरस्कारासाठी लाचार आहेत; संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात

ते पुढे म्हणाले, 'हिंदी ही महाराष्ट्रासाठी एवढी गंभीर बाब नाही. मुंबई, नागपूर, संभाजीनगरसह अनेक ठिकाणी हिंदी वृत्तपत्र, हिंदी शाळा आहेत. मुंबईत नवभारत टाइम्ससारखी जुनी हिंदी दैनिकं आजही प्रसिद्ध आहेत. त्यामुळे हिंदी सक्ती करण्याची गरज काय? हे कोणासाठी केलं जातंय? तुम्ही कोणाची रेशनिंग कार्ड वाढवत आहात?'

उत्तर प्रदेशातील परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केलं. 'ज्या हिंदीसाठी फडणवीस धडपड करत आहेत, त्या उत्तर प्रदेशात गेल्या दोन महिन्यांत 5 हजार शाळा बंद पडल्या आहेत. तिथे शिक्षक नाहीत, शाळा चालत नाहीत. हे सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानांवर प्रसिद्ध होतंय,' असं राऊतांनी सांगितलं.

राऊतांनी केंद्र सरकारवरही टीका केली. 'पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी त्रिसूत्रीची घोषणा केली आहे. पण उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थानसारख्या हिंदी भाषिक राज्यांमध्येच हिंदी शाळा बंद पडत आहेत. मग हिंदी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रावर सक्ती का?'

हेही वाचा: महापालिका प्रशासनाच्या विरोधात स्वराज्य पक्षाचे अन्नत्याग आंदोलन

'मुंबई आणि महाराष्ट्रात हिंदी समृद्ध आहे. इथे हिंदी शिकवावी लागत नाही. मराठीबरोबर हिंदी आपोआप शिकली जाते. त्यामुळे शाळांमध्ये हिंदी सक्तीची गरज नाही. मग फडणवीस कोणासाठी सक्ती करत आहेत? त्यांचा हेतू काय आहे?' असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावरही टीका करत राऊत म्हणाले, 'गुजरातमध्ये हिंदी सक्ती झाली नाही, पण महाराष्ट्रात का केली जाते? गुजरात भाजपाचं मुख्यालय आहे, तिथे तुम्ही हिंदी सक्ती केली नाही. मग मराठी राज्यावर का लादत आहात?'

'हिंदीसाठी बैठका होत आहेत, पण मराठीसाठी एक तरी बैठक झाली का? गुप्त बैठका सुरू आहेत. मुंबई महानगरपालिकेत हिंदी भाषिकांना डोळ्यासमोर ठेवून राजकारण सुरू आहे,' अशी टीका त्यांनी केली.

'महाराष्ट्राच्या शत्रूसारखं वागू नका. फडणवीस आणि शिंदे हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत,' असा गंभीर आरोप करत राऊतांनी आपली भूमिका स्पष्ट केली.


सम्बन्धित सामग्री