Friday, June 12, 2026 10:32:54 PM

Sanjay Raut: ट्रम्प यांच्या अभिनंदनावरून संजय राऊत संतापले; थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाच लिहिलं पत्र, बंगाल निवडणुकीवर उपस्थित केले गंभीर सवाल

पश्चिम बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर संजय राऊत यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहित निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले.

sanjay raut ट्रम्प यांच्या अभिनंदनावरून संजय राऊत संतापले थेट अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनाच लिहिलं पत्र बंगाल निवडणुकीवर उपस्थित केले गंभीर सवाल

Sanjay Raut: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशातील राजकीय वातावरण तापले असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र लिहिल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. बंगाल निवडणुकीच्या निकालानंतर ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केल्याच्या वृत्तांवर राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संजय राऊत यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पत्रात पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रक्रिया ही भारताच्या संघराज्य व्यवस्थेतील अंतर्गत बाब असल्याचे नमूद केले आहे. अशा परिस्थितीत बाहेरील नेत्यांकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया ‘घाईच्या’ आणि ‘अयोग्य’ वाटतात, असे त्यांनी म्हटले आहे.

राऊत यांनी पत्रात निवडणूक प्रक्रियेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मतदान आणि मतमोजणीदरम्यान भीतीचे वातावरण, दबाव आणि प्रशासकीय यंत्रणांचा वापर झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर समोर आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच निवडणूक आयोगाने निष्पक्ष भूमिका घेतली नसल्याची भावना जनतेमध्ये असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.

याशिवाय केंद्रीय सुरक्षा दलांच्या मोठ्या प्रमाणातील तैनातीवरही राऊत यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या दलांच्या उपस्थितीमुळे मतदारांमध्ये विश्वास निर्माण होण्याऐवजी दबावाचे वातावरण निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी  यांनीदेखील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत चिंता व्यक्त केल्याचा उल्लेख पत्रात करण्यात आला आहे.

“लोकशाही म्हणजे केवळ निवडणुका नाहीत, तर त्या मुक्त, निष्पक्ष आणि विश्वासार्ह वातावरणात होणेही तितकेच महत्त्वाचे आहे,” असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. गंभीर आरोप असताना अभिनंदन करण्यापूर्वी या बाबींचा विचार करण्यात आला होता का? असा सवालही त्यांनी ट्रम्प यांना विचारला आहे.

संजय राऊत यांच्या या पत्रामुळे देशातील राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत. विरोधकांकडून या भूमिकेचं समर्थन केलं जात असताना भाजपकडून मात्र यावर टीका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बंगाल निवडणुकीनंतर सुरू झालेला राजकीय संघर्ष आता आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचल्याची चर्चा रंगत आहे.
 


सम्बन्धित सामग्री