महाराष्ट्र: पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात सध्या मोठी खळबळ उडाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला जोरदार धक्का बसण्याची चिन्हं दिसत आहेत. माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचे सुपुत्र आणि पाटण विधानसभा मतदार संघातील महत्वाचे युवा नेतृत्व म्हणून ओळख असलेले सत्यजीत पाटणकर हे भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यांच्या या संभाव्य निर्णयामुळे शरद पवारांच्या गटाला पाटण परिसरात मोठा राजकीय फटका बसू शकतो.
सत्यजीत पाटणकर हे गेल्या काही वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून स्थानिक पातळीवर त्यांची चांगली पकड आहे. विशेषतः पाटण मतदारसंघात त्यांचे स्वतःचे कार्यकर्त्यांचे मजबूत जाळं असून ते शंभुराज देसाई यांचे थेट प्रतिस्पर्धी मानले जातात. शंभुराज देसाई सध्या महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री असून ते भाजपाचे प्रतिनिधित्व करतात. अशा स्थितीत सत्यजीत पाटणकर भाजपात गेल्यास या भागातील राजकीय समीकरणं मोठ्या प्रमाणात बदलू शकतात.
हेही वाचा: मुंबई वाचवायची असेल तर ठाकरे बंधू एकत्र येतील; राऊतांचा स्फोटक दावा
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पाटणकर गटाच्या कार्यकर्त्यांची महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत पुढील राजकीय दिशा ठरवली जाणार आहे. कार्यकर्त्यांमध्येही याबाबत उत्सुकता आहे. पाटणकर गटाचे अनेक स्थानिक नेते आणि कार्यकर्ते देखील भाजपाच्या जवळ जात असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे एकंदरच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) साठी ही स्थिती चिंतेची बनली आहे.
विक्रमसिंह पाटणकर हे शरद पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जात होते. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक महत्त्वाची खाती सांभाळली होती. त्यांच्या मुलाने भाजपाचा हात धरल्यास हा शरद पवारांसाठी केवळ राजकीय नाही, तर भावनिकदृष्ट्याही मोठा धक्का असेल, असे राजकीय विश्लेषक मानतात.
सत्यजीत पाटणकर भाजपात गेल्यास, आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने भाजपाची ताकद पाटण मतदारसंघात वाढणार आहे. पाटणकर यांचे पारंपरिक मतबळ भाजपाच्या गोटात गेल्यास, शंभुराज देसाई यांच्यासाठीही ही आव्हानात्मक स्थिती ठरू शकते.
या पार्श्वभूमीवर, सोमवारी होणारी बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे. सत्यजीत पाटणकर यांचा अधिकृत पक्षप्रवेश कधी होतो, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. त्यांच्या निर्णयामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय चित्र झपाट्याने बदलू शकते.