बुलढाणा: बुलढाण्यात चाललंय तरी काय? असा सवाल उपस्थित होत आहे. आता खरुज व्हायरसची भीती पाहायला मिळत आहे. खरुज व्हायरसचे एकाच गावात 40 हून अधिक रुग्ण झाले आहेत. बुलढाण्यात एकापाठोपाठ नवनवीन आजार समोर येत आहेत. आधी केस गळती, नंतर नख गळतीची लागण आणि आता अंगाला खरुज येत आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात आरोग्याच्या विविध समस्या डोकं वर काढत असतानाचा बुलढाणेकरांना आता नव्या खरुज व्हायरसच्या भीतीने ग्रासून सोडलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या अंगावर खरुज यायला लागली आहे. या एकाच गावात तब्बल 40 पेक्षा अधिक लोकांना या रोगाची लागण झाली असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात खरुज व्हायरस तर आला नाहीये ना? या भीतीने बुलढाणेकर चांगले धास्तावले आहेत. अंगभर खाज घेऊन हे रुग्ण रुग्णालयात गर्दी करत आहेत.
हेही वाचा: Love Horoscope: प्रेमसंबंधांसाठी आजचा दिवस चांगला राहणार असून तुमचा जोडीदार...
दररोज मोठ्या प्रमाणात खरुजाची लागण झालेले रुग्ण दवाखान्यात उपचार घेण्यासाठी येत आहेत. मात्र सरकारी दवाखान्यातील उपचाराने या खाजेवर कुठलचं नियंत्रण मिळवता आले नाहीये. त्यामुळे या रुग्णांनी खाजगी रुग्णालयांकडे धाव घेतली आहे. रुग्णांच्या प्रकृतीमध्ये पहिल्यापेक्षा सुधारणा आहे. काही रुग्ण बरे झाले आहेत. आपण त्यांच्यावर अँटिफंगल उपचार करत आहोत. जर रुग्णांना या उपचार पद्धतीने फरक पडत नसेल तर आपण अजून त्यावरची ट्रीटमेंट देत आहोत. त्यामुळे रुग्णांना आजारांतून बरं होण्यासाठी मदत होत असल्याचे डोनगावचे आरोग्य अधिकारी डॉ. राम गायकवाड यांनी सांगितले आहे.