Tuesday, November 18, 2025 03:56:22 AM

Prof. Vasant Chitnis Passes Away: ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ प्रा. एकनाथ वसंत चिटणीस यांचे पुण्यात निधन; भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात दिले होते महत्वपूर्ण योगदान

डॉ. विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली ISRO स्थापनेत योगदान देणारे आणि SITE प्रयोगाचे सूत्रधार प्रा. एकनाथ चिटणीस यांचे 100व्या वर्षी पुण्यात निधन.

prof vasant chitnis passes away ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ प्रा एकनाथ वसंत चिटणीस यांचे पुण्यात निधन भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रात दिले होते महत्वपूर्ण योगदान

पुणे: भारताच्या अंतराळ संशोधन कार्यक्रमाच्या पायाभूत रचनेत मोलाचे योगदान देणारे ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ प्राध्यापक एकनाथ वसंत चिटणीस यांचे बुधवारी पुण्यात निधन झाले. त्यांचे वय 100 वर्ष होते. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ISRO) स्थापनेत त्यांचा थेट सहभाग होता आणि भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक डॉ. विक्रम साराभाई यांनी त्यांची निवड स्वतः केली होती.

प्रा. चिटणीस यांनी इस्रोच्या प्रारंभिक काळात रॉकेट प्रक्षेपण केंद्रांच्या ठिकाणांची निवड करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांनी प्रथम तिरुवनंतपुरममधील थुंबा येथे प्रक्षेपण केंद्राची निवड केली, त्यानंतर आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथे स्थायी केंद्र उभारण्यात त्यांचा पुढाकार होता. ते अहमदाबाद येथील ‘स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटर’चे संचालक म्हणून 1980 च्या दशकाच्या मध्यापर्यंत कार्यरत होते.

त्यांचे सर्वाधिक उल्लेखनीय कार्य म्हणजे 1975 -76 मध्ये झालेला ‘सॅटेलाइट इन्स्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपेरिमेंट (SITE)’ हा प्रयोग. या उपक्रमाद्वारे अमेरिकेच्या नासाच्या ATS-6 उपग्रहाचा वापर करून सहा राज्यांतील सुमारे 2,400 गावांपर्यंत शैक्षणिक कार्यक्रम पोहोचवले गेले. ग्रामीण भारतात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शिक्षण पोहोचवण्याचा हा पहिलाच प्रयत्न होता.

हेही वाचा: Air India Flight Technical Snag: हवेत तांत्रिक बिघाड! एअर इंडियाचे नेवार्कला जाणारे विमान मुंबईत परतले

कोल्हापूर येथे 1925 मध्ये जन्मलेल्या चिटणीस यांनी प्राथमिक आणि उच्च शिक्षण पुण्यातील सर परशुरामभाऊ महाविद्यालय आणि वाडिया कॉलेजमध्ये घेतले. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील ‘मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT)’ येथून उच्च पदवी प्राप्त केली.

अंतराळ संशोधन क्षेत्राबरोबरच त्यांनी शिक्षण क्षेत्रातही मोठे योगदान दिले. ते जवळपास दोन दशके सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मीडिया आणि कम्युनिकेशन विभागात अध्यापन करत होते. तसेच त्यांनी प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) या वृत्तसंस्थेच्या संचालक मंडळावर 1983 ते 2010 दरम्यान काम केले आणि दोनदा अध्यक्षपदही भूषवले.

त्यांच्या बहुमूल्य योगदानाची दखल घेत भारत सरकारने 1985 मध्ये ‘पद्म भूषण’ पुरस्काराने सन्मानित केले. शास्त्र आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांमध्ये त्यांनी देशाला भक्कम पाया दिला.

प्रा. चिटणीस यांच्या निधनानंतर त्यांच्या मागे त्यांचे चिरंजीव प्रा. चेतन चिटणीस हे आहेत, जे पॅरिसमधील ‘पाश्चर इन्स्टिट्यूट’मध्ये मलेरिया संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या जाण्याने भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रातील एक युग संपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे.

हेही वाचा: Rishabh Tondon: गायक आणि अभिनेता ऋषभ टंडन (फकीर) याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; संगीतविश्वात शोककळा


सम्बन्धित सामग्री