राहाता (शिर्डी): श्री साईबाबा संस्थानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 107 व्या श्री साईबाबा पुण्यतिथी उत्सवास शिर्डीत बुधवारी मंगलमय वातावरणात मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला आहे. आज, गुरुवार (2 ऑक्टोबर), विजयादशमीच्या दिवशीच साईबाबांनी समाधी घेतल्याने (महानिर्वाण झाल्याने) या उत्सवाला विशेष महत्त्व आहे. या निमित्ताने केवळ राज्यभरातूनच नव्हे, तर देशभरातून मोठ्या संख्येने साईभक्तांनी शिर्डीत गर्दी केली असून, येथे श्रद्धेचा महासागर उसळला आहे.
भव्य सजावट आणि आकर्षक देखावा
उत्सवानिमित्त साईबाबांचे समाधी मंदिर आणि परिसराला आकर्षक स्वरूप देण्यात आले आहे. मुंबईतील साई द्वारकामाई मंडळाने मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई आणि 'समुद्र मंथनातील श्री साईरत्न' नावाचा भव्य देखावा तयार केला आहे, जो भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. यासोबतच, ओरिसातील दानशूर साईभक्त सदाशिव दास यांच्या देणगीतून मंदिर परिसरात सुंदर फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
उत्सवाच्या पहिल्या दिवसाचे धार्मिक विधी
उत्सवाच्या पहिल्या दिवशी (बुधवारी) पहाटे श्रींची काकड आरती झाली. त्यानंतर पहाटे 5.45 वाजता श्री साईबाबांच्या प्रतिमा, वीणा आणि श्री साईसच्चरित ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह संस्थानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यात सहभाग घेतला. द्वारकामाई मंदिरात पवित्र साईसच्चरित ग्रंथाच्या अखंड पारायणास प्रारंभ झाला. नंतर श्रींची पाद्यपूजा व मध्यान्ह आरती झाल्यावर रात्री पालखीची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. अखंड पारायणासाठी द्वारकामाई मंदिर रात्रभर उघडे ठेवण्यात आले होते.
हेही वाचा - Ravan Dahan At Home 2025: दसऱ्याला घरात रावण दहन करावे की नाही? यामुळे काही दोष लागतो का? चला, जाणून घेऊ..
पुण्यतिथीचा मुख्य दिवस आणि परंपरा
आज, गुरुवार (2 ऑक्टोबर), उत्सवाचा मुख्य दिवस आहे. या दिवशी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत:
- भिक्षा झोळी: सकाळी 9 वाजता 'भिक्षा झोळी' कार्यक्रम पार पडत आहे. साईबाबांनी आपल्या हयातीत भिक्षा मागून भुकेल्यांना अन्नदान केले होते. तीच परंपरा साईबाबा संस्थानने सुरू ठेवली असून, भिक्षाजोळीतून मिळालेले धान्य आशियातील सर्वात मोठ्या भोजनालयात जमा करून भाविकांना मोफत भोजन प्रसाद दिला जातो.
- अन्य कार्यक्रम: सकाळी 10.30 वाजता समाधीसमोर आराधना विधी, सायंकाळी खंडोबा मंदिरात सीमोल्लंघन कार्यक्रम आणि रात्री 9.15 वाजता शिर्डी गावातून श्रींच्या रथाची मिरवणूक काढण्यात येणार आहे.
- दर्शन: उत्सवामुळे आज समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवले जाणार आहे, त्यामुळे उद्या पहाटेची (3 ऑक्टोबर) काकड आरती होणार नाही.
साईचरणी सुवर्णकडे अर्पण आणि पूरग्रस्तांना मदत
उत्सवादरम्यान साईबाबांच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केले जात आहे. पुणे येथील साईभक्त श्रीमती साधना सुनील कसबे यांनी श्री साईबाबांच्या चरणी तब्बल 13 लाख 12 हजार 538 रुपये किमतीचे सोन्याचे कडे (वजन 123.440 ग्रॅम) अर्पण केले.
याशिवाय, संस्थानने अतिवृष्टीग्रस्त बाधितांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीस यापूर्वी जाहीर केलेली 1 कोटी रुपयांची मदत संकटाची भीषणता लक्षात घेऊन वाढवून 5 कोटी रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठीचा प्रस्ताव उच्च न्यायालयाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
हेही वाचा - Sadetin Shakti Peeh : ही आहेत महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठं; जाणून घेऊया त्यांच्या जन्माची कथा