मालवण: मालवणच्या ऐतिहासिक राजकोट किल्ल्यावर नुकताच उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याच्या चबुतऱ्याला मोठं भगदाड पडलं आहे. या भगदाडामागचं कारण म्हणजे चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली जाणं. विशेष म्हणजे या पुतळ्याचं उद्घाटन अवघ्या महिनाभरापूर्वीच करण्यात आलं होतं. त्यामुळे प्रशासनाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूला मोठं भगदाड पडलेलं स्पष्ट दिसत आहे. स्थानिक नागरिक आणि पर्यटकांमध्ये या घटनेमुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. विशेषतः पावसाळा सुरु होत असताना अशा घटनांनी सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
हेही वाचा: 'फडणवीसांना वाटतं ते सगळ्यांना नाचवू शकतात'; संजय राऊतांची फडणवीसांवर जहरी टीका
छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा तलवारीसह 83 फूट उंच आहे. तो ब्राँझ धातूमधून बनवण्यात आला असून, त्यासाठी विशेष प्रकारचं गंजरोधक साहित्य आणि डुप्लेक्स स्टील फ्रेमवर्क वापरल्याचा दावा करण्यात आला होता. पुतळा उभा करताना वातावरणीय बदल, वादळे आणि समुद्रकिनारी असलेल्या हवामानाच्या स्थितीचा विचार करून संपूर्ण रचना तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात होतं. पुतळ्याचं संपूर्ण काम प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांच्या देखरेखीखाली झालं आहे आणि पुढील 10 वर्ष देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदारावर टाकण्यात आली होती.
प्रशासनाने यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं आहे की, पुतळा पूर्णपणे सुरक्षित आहे. फक्त चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचली असून, पुतळ्याला कोणताही धोका नाही. मात्र, यामुळे भविष्यात अशा पायाभूत सुविधा उभारताना अधिक दक्षता घेणं गरजेचं आहे, हे नक्कीच अधोरेखित झालं आहे.
हेही वाचा: Gold Price: सोन्याने तोडले सर्व रेकॉर्ड; किंमत दररोज नव्या शिखरावर
या आधी याच ठिकाणी उभा करण्यात आलेला 40 फूट उंच पुतळा ऑगस्ट 2024 मध्ये कोसळला होता. त्या घटनेनंतर नव्याने उभारलेला हा पुतळा मे 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आला होता. आता त्याच्या चबुतऱ्याला भगदाड पडलं असल्यामुळे, पुन्हा एकदा राजकारण तापण्याची शक्यता आहे.