Nashik Nandgaon Nagarparishad Election 2025 : मिनी विधानसभा निवडणूक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत नुकतीच संपली आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीतून (Nashik Nandgaon Nagarparishad Election 2025) एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. प्रभाग क्रमांक आठ 'ब' मधून शिवसेना शिंदे गटाच्या खान जुबेदाबी गफार यांचा एकमेव नामनिर्देशन अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे नांदगाव नगरपरिषदेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा पहिला मुस्लिम नगरसेवक बिनविरोध ठरला असून, नाशिक जिल्ह्यात शिंदे गटाने आपले खाते उघडले आहे.
थेट नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत
नांदगाव नगरपरिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी प्रमुख पक्षांमध्ये जोरदार तयारी झाली आहे. शिवसेना शिंदे गटाकडून माजी नगराध्यक्ष राजेश कवडे, अरुण पाटील, माजी नगरसेवक किरण देवरे, सागर हिरे आदींनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) कडून माजी नगराध्यक्ष राजेश बनकर यांना उमेदवारी देऊन शिंदे गटाला आव्हान देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. शिवसेना (उबाठा गट) कडून संतोष गुप्ता यांनी अर्ज दाखल केल्याने नगराध्यक्ष पदासाठी मुख्यतः तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र, यात माजी नगराध्यक्ष राजेश कवडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश बनकर यांच्यातच मुख्य लढत होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, राजेश कवडे सलग दोन टर्म नगराध्यक्ष राहिले आहेत, तर राजेश बनकरदेखील पूर्वी भारतीय जनता पक्षाकडून थेट नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत.
हेही वाचा - BJP vs Shivsena : सेना-भाजप वाद शिगेला! सुरुवात शिवसेनेने केली, आता तक्रार कशाला? फडणवीसांची थेट शिंदे गटाच्या मंत्र्यांना उत्तर
निवडणुकीचे वेळापत्रक
राज्यातल्या 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी येत्या 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला जाहीर होणार आहेत. निवडणुकीच्या प्रक्रियेनुसार, उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतर आता अर्जांची छाननी होणार आहे. छाननीनंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केली जाईल आणि 19 ते 21 नोव्हेंबर या दरम्यान उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील. अखेरीस, 26 नोव्हेंबर रोजी उमेदवारांची चिन्हांसह अंतिम यादी जाहीर करण्यात येणार आहे.