Ajit Pawar Facts : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कामाचा धडाका आणि स्पष्टवक्तेपणामुळे वेगळे स्थान निर्माण करणारे अजित पवार यांचा प्रवास आज एका दुर्दैवी विमान अपघातात संपला. ज्यांनी बारामतीतून सलग नऊ वेळा निवडणूक जिंकण्याचा विक्रम केला, त्या 'दादां'बद्दलच्या या 10 गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू उलगडतात:
1. सहा वेळा उपमुख्यमंत्री होण्याचा अभूतपूर्व विक्रम
अजित पवार हे महाराष्ट्राच्या इतिहासात सहा वेळा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे एकमेव नेते ठरले. त्यांनी पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या चार वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली उपमुख्यमंत्री म्हणून काम केले, जो एक स्वतःतच विक्रम आहे.
2. घड्याळ आणि चष्म्यावरून पटली ओळख
अजित पवार यांना महागड्या आणि ब्रँडेड घड्याळांची विशेष आवड होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे चिन्ह 'घड्याळ' असल्याने ही आवड त्यांच्या राजकीय प्रतिमेशीही जोडली गेली होती. धक्कादायक म्हणजे, विमान अपघातानंतर त्यांच्या शरीराची ओळख त्यांच्या हातातील घड्याळ आणि चष्म्यावरूनच पटवण्यात आली.
3. 'मॉर्निंग पॉलिटिक्स'चे जनक
महाराष्ट्राच्या राजकारणात पहाटेच्या कामाची संस्कृती अजित दादांनी रूजवली. त्यांचा दिवस पहाटे 5:00 वाजता सुरू व्हायचा. मंत्रालयातील फाईल्स निकाली काढणे असो वा लोकांचे प्रश्न ऐकणे, ते नेहमी वेळेच्या आधी हजर असायचे.
4. RSS मुख्यालयापासून कायम राखले अंतर
भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतरही अजित पवारांनी आपल्या मूळ विचारधारेशी तडजोड केली नाही. उपमुख्यमंत्री असतानाही त्यांनी कधीही नागपुरातील रेशीमबाग किंवा RSS मुख्यालयाला भेट दिली नाही. शाहू-फुले-आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांवर ते कायम ठाम राहिले.
5. रोखठोक आणि स्पष्टवक्ते
'दादा' म्हणजे शिस्त आणि स्पष्टवक्तेपणा. कामाबद्दल तडजोड न करणारा हा नेता जे मनात असायचे तेच जिभेवर आणत असे. मग ते कार्यकर्त्यांना फटकारणे असो वा प्रशासकीय अधिकाऱ्यांना कामाला लावणे, त्यांच्या शब्दाला मंत्रालयात मोठी किंमत होती.
6. A+ रक्तगट आणि नेतृत्वगुण
अजित पवारांचा रक्तगट 'ए पॉझिटिव्ह' (A+ ) होता. मानसशास्त्रात असे मानले जाते की, या रक्तगटाचे लोक संवेदनशील, दयाळू पण तितकेच शिस्तबद्ध आणि नेतृत्वगुण संपन्न असतात. त्यांच्या स्वभावात हा संतुलितपणा नेहमीच दिसून आला.
हेही वाचा - Rupali Chakankar On Ajit Pawar Death : "आजच्या घटनेनंतर...काहीच उरलेले नाही" अजित पवारांच्या निधनानंतर रुपाली चाकणकरांची भावनिक पोस्ट
7. धर्मनिरपेक्ष प्रतिमेवर भर
भाजपसोबतच्या युतीनंतरही त्यांनी मुस्लीम आणि अल्पसंख्याक समाजाला कधीही अंतर दिले नाही. नवाब मलिक आणि बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबांच्या पाठीशी ते नेहमी खंबीरपणे उभे राहिले, ज्यामुळे त्यांची एक सेक्युलर नेते म्हणून प्रतिमा कायम राहिली.
8. नोकरशाहीवर मजबूत पकड
मंत्रालयातील कोणत्या विभागाची फाईल कुठे आहे आणि त्यातील तांत्रिक त्रुटी काय, हे दादांना तोंडपाठ असायचे. त्यामुळेच अनुभवाच्या बाबतीत ते अनेक मुख्यमंत्र्यांच्याही पुढे होते.
9. राजकारणात कायमचा शत्रू कोणीही नाही
"राजकारणात कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो" हे त्यांनी सत्तेसाठी केलेल्या प्रयोगांतून सिद्ध केले. राज्याच्या विकासासाठी त्यांनी वेळप्रसंगी टोकाचे निर्णय घेतले, ज्यामुळे राजकीय विश्लेषकही अचंबित व्हायचे.
10. 'दादा' - बारामतीचा अभिमान
बारामतीचा विकास हा जरी शरद पवारांनी सुरू केला असला, तरी तो जमिनीवर राबवण्यात आणि पिंपरी-चिंचवड शहराचा कायापालट करण्यात अजित पवारांचा सिंहाचा वाटा होता. लोकांच्या समस्यांसाठी ते 24 तास उपलब्ध असायचे.