Friday, February 13, 2026 01:09:44 PM

Solapur Political Update: भाजपला रोखण्यासाठी 'एकच चिन्ह, एकच ध्येय'; महापालिका निवडणुकांनंतर सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची 'दिलजमाई'

अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी पार पडलेली एक महत्त्वाची बैठक या नव्या समीकरणाचा पाया ठरली आहे.

solapur political update भाजपला रोखण्यासाठी एकच चिन्ह एकच ध्येय महापालिका निवडणुकांनंतर सोलापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची दिलजमाई

सोलापूर: महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही, याचा प्रत्यय पुन्हा एकदा सोलापूरच्या निमित्ताने येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या प्रयोगानंतर आता सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून काका-पुतण्यांमध्ये सुरू असलेला राजकीय संघर्ष आता म्यान होण्याची चिन्हे असून, ठाकरे बंधूंप्रमाणेच पवार कुटुंबीय देखील जिल्ह्याच्या सत्तेसाठी पुन्हा एकदा 'एक' होताना दिसत आहेत.

अजित पवार यांच्या बारामतीतील निवासस्थानी पार पडलेली एक महत्त्वाची बैठक या नव्या समीकरणाचा पाया ठरली आहे. या बैठकीत शरद पवार गटाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह आमदार अभिजीत पाटील, नारायण आबा पाटील, उत्तम जानकर आणि राजू खरे या दिग्गज नेत्यांची उपस्थिती लक्षणीय होती. सोलापूर जिल्हा हा पारंपरिकपणे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहिला आहे. फुटीनंतरही शरद पवार गटाने जिल्ह्यात चहार आमदार आणि एका खासदारासह आपले वर्चस्व टिकवून ठेवले आहे, तर दुसरीकडे अजित पवार गटाकडे संघटनात्मक ताकद आहे. हीच शक्ती आता एकत्र येण्याच्या तयारीत आहे.

हेही वाचा: Women Cricket Team: विश्वविजेत्या टीम इंडियाचे आता 'मिशन ऑस्ट्रेलिया'वर लक्ष; ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर

या युतीचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे 'एकच चिन्ह'. अजित पवार यांनी आगामी निवडणूक दोन्ही गटांनी एकाच चिन्हाखाली लढवावी, असा प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी रविवारी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते विजयसिंह मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत एक निर्णायक बैठक होणार आहे. जर हे घडले, तर सोलापूरच्या राजकारणात हा एक मोठा ऐतिहासिक बदल ठरेल. सोलापूर महापालिकेत झालेल्या राजकीय पडझडीनंतर, जिल्हा परिषदेत आपली सत्ता पुनर्स्थापित करण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी 'शत्रूचा शत्रू तो आपला मित्र' या उक्तीप्रमाणे एकत्र येण्याचा पवित्रा घेतला आहे.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या सत्तेच्या चाव्या पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी कंबर कसली आहे. भाजपचे जिल्ह्यात वाढलेले वर्चस्व रोखण्यासाठी ही युती अपरिहार्य असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. शरद पवार गटाकडे असलेली जनधारा आणि अजित पवार यांच्याकडे असलेल्या प्रशासकीय पकडीचा संगम झाल्यास, भाजपसमोर मोठे आव्हान उभे ठाकू शकते. यामुळे केवळ जिल्हा परिषदच नव्हे, तर आगामी काळातील इतर निवडणुकांवरही याचे दूरगामी परिणाम होणार आहेत.

अजित पवार यांची वाढती राजकीय ताकद आणि शरद पवारांचे जिल्ह्यात असलेले भावनिक वलय जेव्हा एकत्र येईल, तेव्हा विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण होणे स्वाभाविक आहे. सोलापुरातील या 'पवार पॅटर्न'कडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. "विखुरलेली शक्ती एकत्र आली तर डोंगरही हलवता येतो," या म्हणीप्रमाणे दोन्ही राष्ट्रवादी आता सोलापूरच्या मातीत आपली ताकद पुन्हा एकदा सिद्ध करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत.

हेही वाचा: Kolhapur Political Update: एकनाथ शिंदेंचा ‘करवीर’मध्ये मोठा सर्जिकल स्ट्राईक; काँग्रेसचा बडा मोहरा गळाला, कोल्हापूरचे राजकीय समीकरण रातोरात बदलले


सम्बन्धित सामग्री