Thursday, March 12, 2026 10:26:03 PM

Solapur ZP Election Results 2026: ‘भाजपचा सुपडा साफ करणे सोपे नाही’; पत्नीच्या विजयानंतर राम सातपुते यांनी विरोधकांवर साधला निशाणा

संस्कृती सातपुते यांनी प्रतिष्ठेच्या लढतीत विजय संपादन केला असून या निकालामुळे तालुक्यातील सत्तासमीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

solapur  zp election results 2026 ‘भाजपचा सुपडा साफ करणे सोपे नाही’  पत्नीच्या विजयानंतर राम सातपुते यांनी विरोधकांवर साधला निशाणा

सोलापूर : जिल्ह्याच्या राजकारणात ‘हाय व्होल्टेज’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माळशिरस तालुक्यात भाजपने ऐतिहासिक यश मिळवत मोठी राजकीय मुसंडी मारली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजपने नव्या जोमाने मैदानात उतरत दहिगाव आणि गुरसाळे या महत्त्वाच्या जिल्हा परिषद गटांमध्ये विजय संपादन केला आहे.

या निवडणुकीत माजी आमदार राम सातपुते यांच्या पत्नी संस्कृती सातपुते यांनी शरद पवार गटाचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांचा पराभव करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. दहिगाव जिल्हा परिषद गटातील ही लढत प्रतिष्ठेची मानली जात होती. संस्कृती सातपुते यांनी निर्णायक आघाडी घेत विजय मिळवला. विशेष म्हणजे दहिगाव गटातील दोन्ही पंचायत समिती जागांवरही भाजपने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

प्रचारादरम्यान संस्कृती सातपुते त्यांच्या चार महिन्यांच्या मुलीला कडेवर घेऊन गावोगावी फिरताना दिसत होत्या. एका आईचा संघर्ष आणि जिद्द पाहून महिला मतदारांमध्ये प्रेरणा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: India-US Deal : भारतीय व्यापाऱ्यांना अमेरिकडून 'पेनल्टी टॅरिफ' परत मिळणार? कशी मिळू शकते ही रक्कम?

विजयानंतर राम सातपुते यांनी आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली की, “भाजपचा सुपडा साफ करणे एवढे सोपे नाही. माळशिरस तालुक्यात भाजप उभा करण्याचे काम आम्ही ताकदीने केले आहे. मोहिते पाटील यांच्या उमेदवाराला पंचायत समितीत पराभूत केले आणि जानकर गटाचा जिल्हा परिषदेत पराभव केला. हा विजय देवा भाऊ आणि जया भाऊ यांचा असून, मी हा विजय जनतेला समर्पित करतो.” तसेच जनतेच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

माळशिरस तालुक्यातील ही निवडणूक सातपुते आणि मोहिते पाटील परिवार यांच्यातील प्रतिष्ठेची लढत म्हणून पाहिली जात होती. गेल्या काही महिन्यांपासून दोन्ही गटांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला होता. प्रचारादरम्यान आरोप-प्रत्यारोप आणि टीकेची धार अधिक तीव्र झाली होती. अखेर या चुरशीच्या लढतीत संस्कृती सातपुते यांनी विजय मिळवत तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवे वळण दिले आहे.

हेही वाचा: Shirur Panchayat Samiti Result : रिल्स गाजली, पण मतपेटीने साथ सोडली! निर्मला नवलेंचा शिरूरमध्ये भाजपच्या मनीषा पाचंगेंकडून पराभव


सम्बन्धित सामग्री