Bhor Gram Panchayat Election: भोरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि नगरपरिषदेच्या रणधुमाळीनंतर आता ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीचे बिगुल वाजले आहे. मात्र, भोर तालुक्यातील 9 रिक्त सरपंच पदांच्या निवडणुकीत एक अनपेक्षित वळण पाहायला मिळाले असून, केवळ दोनच गावांमध्ये प्रत्यक्ष मतदानाचा धुरळा उडणार आहे. प्रशासकीय हालचाली आणि राजकीय गणितांमुळे अनेक ठिकाणी बिनविरोध निवडीला प्राधान्य देण्यात आले आहे.
9 सरपंच जागाचे नेमके गणित काय?
भोर तालुक्यातील रिक्त असलेल्या 9 थेट सरपंच आणि 34 सदस्य पदांसाठी प्रशासनाने निवडणूक जाहीर केली होती. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर चित्र स्पष्ट झाले आहे.
5 ठिकाणी बिनविरोध गुलाल: पाच ग्रामपंचायतींमध्ये ग्रामस्थांमध्ये एकमत झाल्याने सरपंचांची बिनविरोध निवड झाली आहे. यामध्ये सोनवडी, शिरवली तर्फे भोर, पऱ्हर, करंदी खुर्द आणि आपटी या गावांचा समावेश आहे.
2 जागांवर चुरस: केवळ रावडी आणि खडकी या दोन ग्रामपंचायतींमध्ये एकापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात असल्याने तिथे 28 एप्रिल रोजी मतदान होईल.
2 जागा उमेदवारांविना: धक्कादायक म्हणजे, दोन ग्रामपंचायतींमध्ये एकाही इच्छुकाने अर्ज भरला नसल्याने ही पदे अद्याप रिक्तच राहणार आहेत.
निवडणुकीचा तपशील आणि राजकीय हालचाली
या निवडणुकीसाठी एकूण 22 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी छाननीत 1 अर्ज बाद झाला, तर 6 जणांनी माघार घेतली. सध्या भोर तालुक्यात प्रचाराने वेग घेतला असून, गावागावांत 'घोंगडी बैठका' रंगू लागल्या आहेत. आपलाच सरपंच व्हावा यासाठी राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, 29 एप्रिलला जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा - West Bengal Election 2026: राहुल गांधींचा ममता बॅनर्जींवर 'अगदी ऐन वेळी' निशाणा; भाजपचा राहुल गांधींना खोचक 'थँक्यू'
471 सरपंच पदांसाठी निवडणूक
दरम्यान, केवळ भोरच नव्हे, तर राज्यातील 34 जिल्ह्यांमध्ये रिक्त असलेल्या जागांवरील पोटनिवडणुकांचा कार्यक्रम सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रात थेट सरपंचपदाच्या 471 आणि सदस्यपदाच्या 3120 रिक्त जागांसाठी हे मतदान होत आहे. या पोटनिवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापल्याचे पाहायला मिळत आहे.