Thursday, March 12, 2026 10:48:32 PM

Mother's Death During Exam: कुठे मातृशोक, तर कुठे प्रकृतीने सोडली साथ...पण तरीही 'त्या' दोघांनी दिली बोर्डाची परीक्षा, विद्यार्थ्यांच्या जिद्दीची महाराष्ट्रभर चर्चा

'आभाळ कोसळलं पण जिद्द हरली नाही', असाच काहीसा प्रत्यय अकोला आणि भंडारा जिल्ह्यातील घटनांमधून आला आहे.

mothers death during exam कुठे मातृशोक तर कुठे प्रकृतीने सोडली साथपण तरीही त्या दोघांनी दिली बोर्डाची परीक्षा विद्यार्थ्यांच्या जिद्दीची महाराष्ट्रभर चर्चा

Mother's Death During Exam: संकटं जेव्हा समोर उभी ठाकतात, तेव्हा धैर्य कसं असावं, याचंच मूर्तिमंत उदाहरण बारावी आणि दहावीच्या दोन विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रासमोर ठेवलं आहे. 'आभाळ कोसळलं पण जिद्द हरली नाही', असाच काहीसा प्रत्यय अकोला आणि भंडारा जिल्ह्यातील घटनांमधून आला आहे.

'सलाईन' सुरू असतानाच सोडवला गणिताचा पेपर 
अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूरमध्ये एका विद्यार्थिनीच्या जिद्दीने सर्वांनाच थक्क केले. 21 फेब्रुवारी रोजी गणिताचा पेपर सुरू असताना अनंतराव देशमुख ज्युनिअर कॉलेजमधील श्रेया गुणवंत देशमुख हिची प्रकृती अचानक खालावली. परीक्षेच्या तणावामुळे तिला चक्कर आली आणि ती बेशुद्ध पडली. केंद्र संचालकांनी तातडीने तिला महाजन रुग्णालयात दाखल केले. विभागीय अध्यक्ष संदीप सांगवे यांनी तातडीने हालचाली करत मुलीच्या प्रकृतीची विचारपूस केली. श्रेयाला शुद्ध आल्यावर तिने "मला पेपर द्यायचा आहे" असा हट्ट धरला. अधिकाऱ्यांनी नियमांचे पालन करत रुग्णालयातच प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पोहोचवली. शिक्षकांच्या निगराणीखाली श्रेयाने हॉस्पिटलच्या बेडवरूनच गणिताचा पेपर पूर्ण केला.

घरात आईचं पार्थिव, डोळ्यात अश्रू; पण त्याने जिद्द सोडली नाही  
दुसरी घटना भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील असून ती मन सुन्न करणारी आहे. सुखराम निदराम भुसारी या दहावीतील विद्यार्थ्याची आई दीर्घकाळापासून आजारी होती. दुर्दैवाने, त्याच्या कारकिर्दीतील पहिल्या बोर्डाच्या पेपरच्या आदल्याच रात्री आईची प्राणज्योत मालवली. आईचे छत्र हरवल्याने सुखरामवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. घरात आईचा मृतदेह अंतिम संस्काराच्या प्रतिक्षेत असताना, त्याने स्वतःला सावरले. आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याने 'पालांदूर' येथील परीक्षा केंद्रावर जाऊन जड अंतःकरणाने मराठीचा पहिला पेपर दिला. त्याच्या या असीम धैर्याचे संपूर्ण शिक्षण क्षेत्रातून कौतुक होत आहे.

हेही वाचा - SC On Local Body Polls: सुप्रीम कोर्टाचा महाराष्ट्राला दणका; 50 टक्के आरक्षण ओलांडलेल्या 22 जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर

नागपुरात पेपरफुटीचा पर्दाफाश; ट्युशन संचालकासह दोघे अटकेत
एकीकडे विद्यार्थी प्रामाणिकपणे संकटांशी लढत असताना, दुसरीकडे नागपुरात पेपर फोडणाऱ्या टोळीवर पोलिसांनी कारवाई केली आहे. सिव्हिल लाइन्स येथील सेंट उर्मूला हायस्कूल केंद्रावर एका विद्यार्थिनीकडे मोबाईल सापडला. तपास केला असता, व्हॉट्सअ‍ॅपवरील 'XII' नावाच्या ग्रुपवर परीक्षेपूर्वीच प्रश्नपत्रिका आणि उत्तरे पाठवण्यात आल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी निशिकांत मून (शिकवणी संचालक) आणि फरहान अख्तर (शिक्षक) यांना अटक केली आहे.  


सम्बन्धित सामग्री