चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यात एक धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. क्षुल्लक कारणावरून एका 35 वर्षीय मुलाने आपल्या 65 वर्षीय आईचा जीव घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. डोंगरगाव येथे घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत महिलेचे नाव सुमित्रा पेटकुले असे असून, आरोपी मुलगा जगदीश पेटकुले याला पोलिसांनी अटक केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, घरात बनवलेल्या कारल्याच्या भाजीवरून आई-मुलामध्ये वाद झाला. आरोपीने जेवणात कारले का बनवले, यावरून आईशी भांडण केले आणि संतापाच्या भरात तिला मारहाण केली.
या मारहाणीत सुमित्रा यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर गावकऱ्यांनी तातडीने पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.माहितीनुसार, आरोपीला दारूचे व्यसन होते. घरातील वाद आणि त्याच्या आक्रमक स्वभावामुळे त्याची पत्नी काही महिन्यांपूर्वीच मुलांना घेऊन माहेरी गेली होती. त्यानंतर तो आईसोबत राहत होता. घटनेच्या वेळीही तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे गावात शोककळा पसरली आहे. एका क्षुल्लक कारणावरून मुलाने आईचा जीव घेतल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलिसांकडून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.