Zilla Parishad Elections 2026: दि. 7 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या निवडणुकांमध्ये मतदारांच्या बोटावर आता मार्कर पेनऐवजी पुन्हा पारंपरिक निळी शाई लावण्यात येणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अलीकडील निवडणुकांमध्ये मार्करने लावलेली निशाणी पुसली जात असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर आयोगाने ही खबरदारी घेतली आहे.
महापालिका निवडणुकांच्या वेळी अनेक ठिकाणी मतदारांनी बोटावरील शाई सहज पुसली जात असल्याचे सोशल मीडियावर दाखवले होते. यामुळे दुहेरी मतदानाची शक्यता निर्माण होऊ शकते, अशी भीती राजकीय पक्षांनी व्यक्त केली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे, शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नेत्या रुपाली चाकणकर यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती.
या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने आता मार्कर पेनचा वापर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. आयोगाने स्पष्ट केले आहे की, आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदारांच्या बोटावर शाईच लावली जाईल. ही शाई म्हैसूर येथील ‘म्हैसूर पेंट्स अँड व्हर्निश लिमिटेड’ या कंपनीकडून मागवण्यात आली आहे. हीच शाई लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी केंद्र निवडणूक आयोगाकडून अनेक वर्षांपासून वापरली जाते.
राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वी निवडणूक कर्मचाऱ्यांना शाईच्या बाटल्या हाताळताना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन मार्कर पेन वापरण्याचा निर्णय घेतला होता. मात्र प्रत्यक्षात मार्करची शाई टिकत नसल्याच्या तक्रारी समोर आल्याने हा प्रयोग अयशस्वी ठरल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता पुन्हा पारंपरिक आणि विश्वासार्ह शाईकडे वळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
निवडणूक आयोगाच्या वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाई पुसली गेली, अशा तक्रारी येऊ नयेत आणि निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास कायम राहावा, यासाठी हा बदल करण्यात आला आहे. आयोगाने काही ठिकाणी शाईच्या बाटल्यांचा वापर करून चाचणीही सुरू केली असून, त्याचे निष्कर्ष सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे.
या निर्णयामुळे निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राहील आणि दुहेरी मतदानाच्या शक्यतेवर आळा बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. ७ फेब्रुवारीच्या निवडणुकांसाठी हा बदल महत्त्वाचा ठरणार असून, राज्य निवडणूक आयोगाचा हा निर्णय राजकीय पक्षांमध्येही स्वागतार्ह मानला जात आहे.