Uddhav Thackrey On Farmers' Aid: राज्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला लक्ष्य केलं आहे. उद्धव ठाकरे आगामी काही दिवसांत मराठवाड्याचा दौरा करणार असून, शेतकऱ्यांना दिलेल्या पॅकेजचा प्रत्यक्ष लाभ किती पोहोचला, हे स्वतः पाहणार आहेत.
शेतकऱ्यांना दिलेल्या मदतीचा हिशोब मागणार
उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारने पॅकेज दिलं, पण शेतकऱ्यांच्या हातात काय पडलं? जी जमीन पावसाने खरडून गेली, तिच्यासाठी शेतकरी आज माती मागत आहेत. त्यांना ती मातीच मिळत नसेल, तर पुढच्या पायऱ्या कशा होणार? त्यांनी पुढे प्रश्न उपस्थित केला की, दर हेक्टरी 50,000 मदतीची मागणी आणि कर्जमाफीची अपेक्षा शेतकऱ्यांनी वारंवार व्यक्त केली आहे. पण सरकारकडून फक्त आश्वासनं आणि घोषणा मिळतात, प्रत्यक्ष मदत नाही.
हेही वाचा - Pandharpur Vitthal Darshan: भाविकांसाठी मोठा दिलासा! पंढरपूरात तिरुपतीप्रमाणे दर्शन मंडप उभारण्यास 130 कोटींची मंजुरी
मुख्यमंत्र्यांनी जून महिन्यात कर्जमाफीची घोषणा केली असली, तरी ठाकरे यांनी ती ‘ढगाळ आशा’ ठरल्याचे म्हटले. जर कर्जमाफी पुढच्या जूनमध्ये होणार असेल, तर आताच्या शेतकऱ्यांनी हप्ते भरायचे की नाही? हे सरकार ठरवणार का? की फक्त खेळ मांडणार? असा सवाल त्यांनी केला. उद्घव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या विधानावरही टीका केली, कर्जमाफी केली तर बँकांचा फायदा होईल म्हणून न करण्याचं कारण देतात. पण जूनमध्ये केली तर फायदा होत नाही का? हे कोणतं अर्थशास्त्र आहे?
हेही वाचा - Maharashtra board exams: महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय! HSC–SSC परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाणार
दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली. मी मुख्यमंत्री असताना नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात कोणीही मागणी न करता, कोणताही अभ्यास न करता मी दोन लाखांपर्यंतची पीककर्ज माफी केली होती. ती योजना यशस्वी झाली होती, आणि त्या सिस्टीमचा डेटा अजूनही सरकारकडे आहे. मग हे सरकार दुसरा टप्पा का राबवत नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
अतिवृष्टीनंतरच्या पॅकेजवरही टीका
उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टीनंतर जाहीर करण्यात आलेल्या मदतपॅकेजवरही नाराजी व्यक्त केली. खरडून गेलेल्या जमिनींसाठी तीन-साडेतीन लाख रुपये मनरेगातून देणार होते. त्यातले एक लाख रुपये तरी दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात द्या, अशी मागणी मी मोर्चादरम्यान केली होती. पण आजतागायत त्या पैशांचा काही मागमूस नाही, असे ते म्हणाले.
शेतकऱ्यांची थट्टा थांबवा
तथापी उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकरी आजही संकटात आहे. पिकं गेली, जमीन वाहून गेली, कर्ज डोक्यावर आहे, आणि सरकार फक्त पाहतंय. ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. आमचं सरकार असताना आम्ही शेतकऱ्यांशी प्रामाणिकपणे वागलो, पण हे सरकार फक्त कागदावर काम करतंय. उद्धव ठाकरे यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यात पुन्हा एकदा कर्जमाफी आणि शेतकरी मदतीचा मुद्दा राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू ठरणार आहे. त्यांच्या मराठवाडा दौऱ्यातून सरकारवर आणखी दबाव वाढण्याची शक्यता आहे.