Maharashtra Govt Job: दिवस-रात्र एक करून सरकारी नोकरीसाठी मेहनत घेणाऱ्या लाखो उमेदवारांना राज्य सरकारने मोठा धक्का दिला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) होणारी लघुलेखक (Stenographer) पदाची भरती रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी, जे गेल्या 5 ते 6 वर्षांपासून या पदासाठी जिद्दीने तयारी करत होते, त्यांच्या भविष्यासमोर आता मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या अनेक वर्षांच्या कष्टावर पाणी फेरले गेले आहे.
जळगावात विद्यार्थ्यांचे रणशिंग; मंत्र्यांना घातला घेराव
शासनाच्या या अघोषित बंदीच्या विरोधात जळगावमधील विद्यार्थी आता आक्रमक झाले आहेत. आपल्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी थेट रस्त्यावर उतरून पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे आणि आमदार सुरेश भोळे यांची भेट घेतली व त्यांना घेराव घातला. "आम्ही 5-6 वर्षे क्लासेस लावून स्टेनोचे कठोर प्रशिक्षण घेतले, आता कुठे भरतीची अपेक्षा होती, पण सरकारने आमचा विश्वासघात केला आहे," अशी संतप्त भावना विद्यार्थ्यांनी यावेळी मंत्र्यांसमोर व्यक्त केली.
2018 पासून उमेदवारांची प्रतीक्षा
राज्यातील विविध सरकारी विभागांमध्ये लघुलेखकांची हजारो पदे रिक्त असतानाही प्रशासन जाणीवपूर्वक भरती टाळत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. लघुलेखक पदासाठी शेवटची जाहिरात 2018 आणि 2022 मध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र, मागील 4 वर्षांपासून एकही नवी नियुक्ती झालेली नाही. आता तर नवीन पदभरती प्रक्रियाच रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने हजारो उमेदवारांचे श्रम आणि पैसे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
हेही वाचा - Maharashtra Government On MPSC Student : MPSC उमेदवारांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; परीक्षेत अंतिम निवड न झालेल्यांना आता थेट....
"आता कुठे जायचं?" विद्यार्थ्यांचा आर्त सवाल आणि आंदोलनाचा इशारा
ग्रामीण भागातील हजारो मध्यमवर्गीय मुले 'स्टेनो' सारख्या कौशल्यावर आधारित नोकरीसाठी शहरात येऊन मोठा संघर्ष करतात. "चार-पाच वर्षे एकाच विषयाची तयारी केल्यानंतर आता अचानक क्षेत्र बदलणे आमच्यासाठी शक्य नाही. सरकारने आमचे वय आणि कष्ट यांचा गांभीर्याने विचार करावा," अशी आर्त हाक विद्यार्थी देत आहेत. जर सरकारने हा 'भरती रद्द' करण्याचा निर्णय तातडीने मागे घेतला नाही, तर संपूर्ण राज्यभरातील स्टेनोग्राफर उमेदवार एकत्रित येऊन तीव्र आंदोलन छेडतील, असा इशारा विद्यार्थी संघटनांनी दिला आहे.