नाशिक: भाजपमध्ये सध्या मोठे राजकीय हालचाली सुरू असून, शहरातील एक माजी पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांना पक्षात घेण्याबाबत वरिष्ठ नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे समजते. विशेष म्हणजे, स्थानिक पातळीवर या निर्णयाला तीव्र विरोध होत असतानाही, राज्याच्या वरिष्ठ पातळीवर मात्र बडगुजर यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळण्याची शक्यता आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपा आमदार सीमा हिरे यांच्यासह अनेक स्थानिक नेते व पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन बडगुजर यांचा पक्षप्रवेश थांबवण्याची मागणी केली होती. बडगुजर यांचा राजकीय भूतकाळ, त्यांची पूर्वीची भूमिका आणि शहरातील काही वादग्रस्त घडामोडींमध्ये त्यांचा सहभाग, या सर्व गोष्टींमुळे स्थानिक पातळीवर त्यांचा विरोध वाढलेला आहे.
मात्र दुसरीकडे, भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांचे मत वेगळे दिसत आहे. पक्ष वाढीसाठी आणि आगामी नाशिक महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर पक्षातील प्रभावशाली नेत्यांना भाजपमध्ये आणण्याची रणनीती सध्या तयार करण्यात येत आहे. त्या अंतर्गत सुधाकर बडगुजर यांच्यासह आणखी काही नेत्यांच्या नावांचीही चर्चा सुरू आहे.
हेही वाचा: 'आम्ही मराठी माणसासाठी काम ... ; ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर भरत गोगावले यांची जोरदार टीका
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिकेवर सत्ता मिळवण्याचा भाजपचा निर्धार असून, त्यामुळे मतदारसंघात प्रभाव असलेल्या नेत्यांना पक्षात घेण्याची प्रक्रिया जोरात सुरू आहे. स्थानिक विरोध असूनही, या नेत्यांचा प्रवेश भविष्यातील निवडणुकीसाठी फायदेशीर ठरू शकतो, अशी रणनीती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी आखली आहे.
मुंबईत झालेल्या चर्चांनंतर बडगुजर यांचा पक्षप्रवेश कधी होणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली असली तरी, स्थानिक नेत्यांनी अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. काही नेते मुंबईहून परतल्यानंतर बडगुजर यांच्याविषयी बोलणं टाळत आहेत, हे विशेष लक्षवेधी ठरत आहे.
राजकीय वर्तुळात बडगुजर यांचा प्रवेश हा केवळ सुरुवात असून, भाजपमध्ये येत्या काही दिवसांत मोठे फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नाशिकच्या राजकारणात आगामी काळात मोठ्या घडामोडी पाहायला मिळण्याची चिन्हं आहेत.