मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर विराजमान झालेल्या सुनेत्रा पवार यांनी आता खऱ्या अर्थाने प्रशासकीय सुत्रे हाती घेण्यास सुरुवात केली आहे. राज्य सरकारने सोमवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत, मंत्रालयातील अजित पवार यांच्या वापराखालील सर्व दालने सुनेत्रा पवार यांच्याकडेच कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भातील शासन निर्णय (GR) निर्गमित केला असून, या आठवड्याअखेरीस त्या आपल्या पदाचा पदभार स्वीकारतील, अशी दाट शक्यता आहे.
मंत्रालयाच्या पाचव्या, सहाव्या आणि सातव्या मजल्यावरील ज्या दालनांतून अजितदादा राज्याचा कारभार पाहायचे, आता त्याच दालनांतून सुनेत्रा वहिनी जनसेवेचे व्रत पुढे नेणार आहेत. मंत्रालयातील मुख्य इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील उत्तर बाजूची कार्यालयीन जागा, सातव्या मजल्यावरील पूर्व बाजूची दालने, तसेच दालन क्रमांक 717, 722 आणि 723 ही सर्व कार्यालये आता सुनेत्रा पवार यांच्या नावे निश्चित झाली आहेत. 'वसा आणि वारसा' जपण्याच्या या प्रवासात प्रशासकीय व्यवस्थाही तोच जुना धागा पकडून पुढे जाताना दिसत आहे.
केवळ मंत्रालयातील दालनेच नव्हे, तर मलबार हिल येथील 'देवगिरी' हे राज्याचे हाय प्रोफाईल शासकीय निवासस्थानही सुनेत्रा पवार यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. अजित पवार उपमुख्यमंत्री असताना आणि त्यापूर्वी विरोधी पक्षनेते असतानाही 'देवगिरी' हे त्यांच्या राजकीय रणनीतीचे मुख्य केंद्र होते. आता याच निवासस्थानातून सुनेत्रा पवार आगामी राजकीय आणि सामाजिक आव्हानांना सामोरे जातील. त्यामुळे सत्तेच्या वर्तुळात 'देवगिरी'चा दरारा आणि दबदबा पूर्वीप्रमाणेच कायम राहणार असल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा: Ladaki Bahin Yojna : 'लाडकी बहीण योजना' अजित पवार यांच्या नावाने ओळखली जावी; राष्ट्रवादीतील नेत्याची मुख्यमंत्र्यांकडे भावूक मागणी
खातेवाटपाबाबत बोलायचे झाले तर, सुनेत्रा पवार यांच्यावर राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक आणि औकाफ यांसारख्या महत्त्वपूर्ण खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. महसूल आणि समाज कल्याणाच्या दृष्टीने ही खाती अत्यंत महत्त्वाची मानली जातात. अजित पवार यांच्या कार्यपद्धतीची छाप त्यांच्या प्रशासकीय निर्णयांतून दिसते की नाही, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल. "जबाबदारी मोठी असली की पावलेही तितक्याच खंबीरपणे टाकावी लागतात," याप्रमाणे सुनेत्रा पवार यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे.
नव्या इनिंगची सुरुवात करताना सुनेत्रा पवार यांनी सोमवारी कराड गाठले. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या 'प्रितीसंगम' या समाधीस्थळी त्यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी घेतलेली ही आदरांजली केवळ राजकीय शिष्टाचार नसून, राज्याच्या महान परंपरेचा आशीर्वाद घेण्याचा एक प्रयत्न मानला जात आहे. या आठवड्याच्या अखेरपर्यंत त्या मंत्रालयातील दालनात बसून अधिकृतपणे कारभाराची 'श्रीगणेशा' करतील.
हेही वाचा: Maharashtra Government Cancel Cabinet Meeting : अजित पवारांच्या निधनानंतर राज्य सरकारचा मोठा निर्णय; मंत्रिमंडळ बैठक होणार नाही?